Fri. Jan 28th, 2022

ब्राह्मण महासंघातर्फे जावेद अख्तर यांना विरोध

   ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या ३, ४ आणि ५ डिसेंबर रोजी नाशिकमध्ये होणार आहे. नाशिकमधील भुजबळ नॉलेज सिटीमध्ये हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तसेच उद्घाटन विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गीतकार जावेद अख्तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

  मात्र ब्राह्मण महासंघातर्फे जावेद अख्तर यांच्या नावाला विरोध करण्यात आला आहे. भगवंत पाठक यांच्या नेतृत्वाखाली साहित्य संमेलनाचे कार्यालयीन प्रमुख दिलीप साळवेकर यांना निवेदन देऊन जावेद अख्तर यांचे नाव वगळण्याची मागणी ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आली आहे.

   गीतकार जावेद अख्तर यांच्या नावाला उद्घाटक म्हणून आधीच काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता. मात्र, विश्वास पाटील यांचे नाव उद्घाटक म्हणून निश्चित झाल्यानंतर तो मावळला असला, तरीही प्रमुख पाहुणे म्हणून जावेद अख्तर यांना विरोध करण्यात येत आहे. काही हिंदुत्ववादी संघटनांच्या मते अख्तर यांचे मराठी साहित्यात काहीही योगदान नाही. त्यामुळे त्यांना उद्घाटक म्हणून बोलवू नये, अशी प्रतिक्रिया ब्राम्हण महासंघाच्यावतीने करण्यात येत आहे.

   संमेलनाचा समारोप राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते होणार अशी माहिती स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिली.

  मराठी साहित्य संमेलन भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रशस्त मैदानावर पार पडणार आहे. तसेच या संमेलनात बालकवी संमेलन, कवी कट्टा, गझल आणि भव्य पुस्तकाचे प्रदर्शन यावेळी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *