Thu. Dec 2nd, 2021

‘सुर्यवंशी’ चित्रपटाला पंजाबमध्ये विरोध

  कोरोना काळात गेली दीड वर्ष संपूर्ण देशासह चित्रपटगृहांनादेखील टाळे लागले होते. मात्र आता कोरोना रुग्णांच्य़ा संख्य़ेत घट झाल्यामुळे निर्बंध शिथिल करून चित्रपटगृहांचे दार प्रेक्षकांसाठी खुले करण्य़ात आले. अखेर दोन वर्षानंतर बॉलिवूडमधील खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारचा ‘सुर्यवंशी’ चित्रपट ५ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. महाराष्ट्रात सुर्यवंशी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. मात्र, पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी सुर्यवंशी चित्रपटाला विरोध केला.

  पंजाबमधील शेतकऱ्यांनी आंदोलन करुन, सुर्यवंशी चित्रपटाला विरोध केला तसेच चित्रपटगृहांमधील सुर्यवंशी चित्रपटाचे प्रदर्शनदेखील थांबवण्यात आले. पंजाबमधील बुडलाधा येथील सुर्यवंशी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले. तसेच ‘पंजाब किसान एकता मोर्चा’ने फेसबुकवर पोस्ट करत सुर्यवंशी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. ‘ते आले त्यांनी आपल्याला लुटलं आणि मग आपल्याला  विसरुन गेले. पंजाबच्या चित्रपटगृहांमध्ये सुर्यवंशी चित्रपटाच्या प्रदर्शनास आम्ही विरोध करत आहोत. तसेच आम्ही आमची आणखी लुटमार होऊ देणार नाही, असे पोस्ट करत ‘पंजाब किसान एकता मोर्चा’ने सुर्यवंशी चित्रपटावर बहिष्कार टाकला.

  केंद्र सरकारने केलेल्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या तक्ख्त्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. पंजाबचे शेतकरी केंद्र सरकारने आखलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात आहेत. याच शेतकऱ्यांनी अक्षय कुमारच्या सुर्यवंशी चित्रपटाच्या विरोध दर्शविला आहे.

  महाराष्ट्रात मात्र, अक्षय कुमारचा सुर्यवंशी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. कोरोना काळात बंद असलेले चित्रपटगृह आता हाऊसफूल होत आहेत. त्यामुळे लॉकडाऊननंतर प्रदर्शित झालेल्या सुर्यवंशी चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *