राज्यात साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त

राज्यात कोरोना परिस्थिती काही प्रमाणात स्थिरावली असताना, साथीच्या आजाराने तोंड वर केले आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात राज्यात डेंग्यू आजाराचे २५४ रुग्ण आढळले आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात डेंग्यूचे १५ रुग्ण आढळले होते. त्यामुळे ऐन दिवाळीत डेंग्यूचे वाढते रुग्ण नागरिकांना चिंतेचे कारण ठरले आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचे २५४, मलेरियाचे ५७६, गॅस्ट्रोचे २४७, लेप्टोचे ३२, चिकनगुनियाचे ३३, तसेच ४१ नागरिकांना कावीळची बाधा आणि एचवनएनवनचे ८ रुग्ण आढळले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात साथीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच पालिका रुग्णालयातील बेड्सही भरु लागले आहते. डेंग्यू, मलेरिया रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर चिकनगुनिया रुग्णांच्या संख्येत चार पटीने वाढ झाली आहे.
पालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले, प्रत्येक विभागात साथीच्या रोगाबाबत जागरूकता वाढवण्यात आली आहे. त्याचसोबत साथीच्या रुग्णांचे सर्वेक्षण, निदान आणि उपचारांवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला आहे. तसेच प्रत्येक दवाखाने आणि रुग्णालयांना रक्त तपासणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईतील कोरोना लसीकरण चार दिवस बंद
देशाने १०० कोटी कोरोना लसीकरण पूर्ण करण्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. तसेच राज्यात सर्व नागरिकांनी लसीकरण घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात येते. मात्र अशातच मुंबईत पुढील चार दिवस लसीकरण बंद असणार आहे. गुरुवार ते रविवार या चार दिवशी कोरोना लसीकरण बंद असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.