Fri. Apr 10th, 2020

ओवैसी यांची भिवंडीतील जाहीर सभा अखेर रद्द

भिवंडीमध्ये एमआयएमचे (MIM) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांची आज जाहीर सभा होती. मात्र पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी परवानगी नाकारली. या सभेला भिवंडीतील परशुराम टावरे स्टेडियमवर सभेची पूर्ण तयारी करण्यात आली होती. परंतु आयत्या वेळेस या सभेला परवानगी नाकारल्याने स्टेडियमवर उभारण्यात आलेले स्टेज, खुर्च्या आणि ताडपत्री उचलण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.

या सभेला लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याने पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता.

ही सभा रद्द झाली असल्याचं औरंगाबादचे खासदार व प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी स्वतः आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट करून स्पष्ट केलं. ‘पोलिसांच्या विनंतीला मान देऊन ही सभा रद्द झाली असून मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेणार असल्याचं’ इम्तियाज जलील यांनी ट्विटरवर लिहिलं आहे. दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर, चांदबाग, गोकुलपुरी या आसपासच्या भागात झालेल्या हिंसाचाराचा परिणाम भिवंडीमध्ये होऊ नये, यासाठी अतिसंवेदशील शहर असणाऱ्या भिवंडीत असदुद्दीन ओवेसी यांची आज सायंकाळी 6 वाजताची सभा पुढे ढकलण्यात आली आहे.

आज सायंकाळी सीएए , एनआरसी, व एनपीआरच्या विरोधात एम आय एमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी दिल्ली येथे झालेल्या दंगल परिस्थिती पाहता आणि भिवंडी शहर हे संवेदनशील शहर असल्याने शहरात कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी भिवंडी भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी यांनी केली. शहराचं वातावरण ओवैसी यांच्या भाषणामुळे बिघडू शकतं, त्यामुळे या सभेला आता भिवंडीचं एकूण वातावरण पाहता या सभा पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *