पाळीव कुत्र्याचं ओरडणं बेतलं मालकिणीच्या जीवावर

पाळीव कुत्र्याच्या ओरडण्याचा त्रास झाल्यानं शेजाऱ्यांनी महिलेला मारहाण केली आणि त्यात महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. याप्रकरणी उशिरा जाग्या झालेल्या पोलिसांनी तब्बल 24 तासांनंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
काय घडलं नेमकं?
डोंबिवलीच्या मानपाडा रोडवरील एका चाळीत राहणाऱ्या नागम्मा शेट्टी या महिलेकडे एक पाळीव कुत्रा होता.
मात्र हा कुत्रा सतत ओरडत असल्यानं आम्हाला त्रास होत असल्याची शेजाऱ्यांची तक्रार होती.
यावरून सोमवारी रात्री नागम्मा आणि तिच्या शेजाऱ्यांमध्ये वाद झाले.
यानंतर शेजारच्या चार महिलांनी मिळून नागम्माला मारहाण केली, ज्यात तिचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर मानपाडा पोलिसांनी साधी एनसीदेखील नोंदवून घेतली नाही.
त्यामुळे या महिलेच्या पोरक्या झालेल्या चार मुलींनी भाजपच्या महिला ग्रामीण शहराध्यक्ष मनीषा राणे यांच्याकडे धाव घेत व्यथा मांडली.
भाजपनं याप्रकरणी पोलिसांना जाब विचारताच पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याच्या प्रक्रियेला तब्बल 24 तासांनी सुरुवात केली. मात्र अद्याप याप्रकरणी कुणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाही. त्यामुळे पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली जातेय.