मालकाचा बैलावरील प्रेमाचा अनोखा नमुना

गणेश दुडम, पिंपरी
बैलगाडी शर्यतीवर बंदी असली तरी मालक आणि चालकांनी त्यांच्या बैलावरील प्रेम काही कमी केलं नाही. शर्यतीचे अनेक घाट गाजवणाऱ्या पिंपरी चिंचवडच्या मावळ तालुक्यातील धामणे गावात एका बैलाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. मात्र त्यानंतर मालकाने एखाद्या घरच्या सदस्याप्रमाणे त्याचे अंत्यसंस्कार केले.
कबिरया हा खोंड सहा महिन्याचा असताना मावळातील गराडे कुटुंबीयांचा सदस्य झाला.
पोटच्या मुलाप्रमाणे कबिरयाला गराडे कुटुंबियांनी जपलं.
वेळच्या वेळी खुराक, आरोग्याची निगा इतकंच नव्हे तर प्रत्येक सणाला त्याला नटवलं जायचं.
शर्यतीसाठी त्याचं योग्य ते प्रशिक्षण घेत त्याला खिल्लार बनवलं.
म्हणूनच अनेक वर्ष तो शर्यतीच्या घाटाचा राजा राहिला.
पाच वर्षांपूर्वी शर्यतीवर बंदी आली, याच शर्यतीवरील बंदी हटण्याची प्रतीक्षा सुरु असताना वयाच्या अठराव्या वर्षी कबिरयाने अखेरचा श्वास घेतला.
कुटुंबातील सदस्य गेल्याची सद्भावना बाळगत, गराडे कुटुंबीयांनी कबिरयाची समाधी उभारली.
दशक्रिया विधीवत पूजाही केली. कुटुंबीयांनी मुंडनही केलं. पिंडदान करताना कावळा येत नसल्याने महिला सदस्य आणि बैलावर अफाट प्रेम करणारे बच्चे कंपनी यांनी हात जोडून माफीही मागितली. घाट गाजवणारा कबिरया राज्यभर प्रचलित असल्याने पुणे जिल्ह्यातील गाडा मालक-चालकांनी ही दशक्रियेला हजेरी लावली.
मुक्या प्राण्यांवर लावलेलं हे प्रेम पाहून, कबिरयाच्या कुटुंबीयांचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय. तर बैलगाडी शर्यत बंदीनंतर ही गाडी मालक-चालक बैलांवर किती प्रेम करतायेत हे ही यातून अधोरेखित झालंय.