Thu. May 6th, 2021

राज्यात नियमित शस्त्रक्रिया रद्द करुन ऑक्सिजन वापरात सुसूत्रता

ऑक्सिजनच्या टंचाईमुळे राज्यात भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे वाढते संकट आणि दुसरीकडे आरोग्य यंत्रणेवरील वाढत्या ताणामुळे व्यवस्थेपुढे आव्हान निर्माण झाले आहे. अशा स्थितीत राज्याच्या टास्क फोर्सने ऑक्सिजनच्या वापराविषयी राज्य सरकारला वेगवेगळ्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार, नियमित शस्त्रक्रिया रद्द करुन ऑक्सिजन वापरात सुसूत्रता आणण्यासाठी नियमावली सूचवली आहे.

कोरोना रुग्णांना मोठ्या प्रमाणावर उपयुक्त असल्याचे स्पष्ट झाले, पण प्रतिमिनिट ८० लीटरपर्यंत ऑक्सिजन लागणाऱ्या ‘एचएफएनओ’चा वापर बंद करून त्याऐवजी कमी ऑक्सिजनची गरज असणाऱ्या आणि सर्वसाधारणपणे तेवढ्याच प्रभावी ‘नॉन इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेशन’चा (एनआयव्ही) वापर करण्याची सूचना देण्यात आली आहे. यामुळे ऑक्सिजनची लक्षणीय बचत होऊ शकते.

ऑक्सिजन प्रत्येक ठिकाणी वाचवा, रुग्णालयांतील ऑक्सिजन गळती थांबवा, गरज नसेल तर फ्लो मीटर बंद करा, समितीद्वारे वापरावर देखरेख ठेवा, तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रिया थांबवा आणि ऑक्सिजनवर आधारित उपचार पुढे ढकला, अशा सूचना केल्याची माहिती डॉ. राहुल पंडित यांनी दिली.

टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांची त्वरित कठोर अंमलबजावणी केल्यास ऑक्सिजनच्या पुरवठ्याचे व्यवस्थापन करण्यात निश्चितच सुधारणा झालेली दिसून येईल, असे मत टास्क फाेर्सने मांडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *