Thu. Jun 17th, 2021

नौदलाचे ऑपरेशन ‘समुद्र सेतू-२’ सुरु

कोरोनाच्या महामारीविरोधात सुरू असलेल्या लढ्यात राष्ट्रीय स्तरावरच्या प्रयत्नांना हातभार लावण्याच्या हेतूने, भारतीय नौदलाने ऑपरेशन ‘समुद्र सेतू-२’ सुरू केले आहे. या अंतर्गत, नौदलाच्या तिन्ही विभागातून म्हणजेच मुंबई, विशाखापट्टणम आणि कोची येथून भारताच्या युद्धनौका रवाना झाल्या आहेत. या नौकांमधून विविध मित्र राष्ट्रांकडून समुद्रमार्गे ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय साधने आणली जात आहेत.

बुधवारी दुपारी भारताची युद्धनौका आयएनएस तलवार बहरीन येथून २७ टन द्रवरूप ऑक्सिजनचे २ टँक घेऊन भारतात कर्नाटकच्या न्यू मंगलोर पोर्टच्या धक्क्यावर पोहोचली. त्याशिवाय, आयएनएस कोलकाता कुवैतहून २७ टन द्रवरूप ऑक्सिजनचे दोन टँक घेऊन ४०० ऑक्सिजनयुक्त सिलेंडर्स, ५७ काँसंट्रेटर्स आणि इतर वैद्यकीय साधने घेऊन भारताकडे रवाना झाल्या आहेत. यासोबतच, आणखी चारयुद्धनौका कुवैत तसेच कतार येथून २७ टन द्रवरूप ऑक्सिजनचे टँक आणि १५०० पेक्षा अधिक ऑक्सिजन सिलेंडर्स घेऊन येणार आहेत.

पूर्व समुद्रमार्गाने भारताची युद्धनौका आयएनएस ऐरावत सिंगापूरहून ३००० पेक्षा अधिक ऑक्सिजन सिलेंडर्स, २७ टन द्रवरूप ऑक्सिजनचे आठ टँक (२१६ टन), १०००० रॅपिड अँटीजेन टेस्ट कीट्स आणि ७ काँसंट्रेटर्स घेऊन भारताकडे रवाना झाली आहे. तसेच आयएनएस युद्धनौका सध्या नैक्रत्य आशियात तैनात असून, परिस्थितीनुसार गरज भासल्यास, तिलाही त्या प्रदेशातील बंदरावर पाठवले जाऊ शकते.

आयएनएस शार्दूल ही कोचीच्या तळावरील युद्धनौकादेखील आखाती देशांतून ३ द्रवरूप ऑक्सिजन भरलेले क्रायोजनिक कंटेनर्स घेऊन येत आहे. मागील वर्षी नौदलाने जसे समुद्र सेतू अभियान राबवून हिंद महासागर प्रदेशातल्या देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणले होते, तशाच प्रकारे भारतीय नौदल आजही देशाच्या या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *