राज्यात ऑक्सिजन पुरवठ्याची बोंब

कोरोनाचा नवा विषाणू आमिओक्रॉनचे संकट घोंगावू लागल्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. धूळ खात पडलेल्या ऑक्सिजन यंत्रणेकडे प्रशासनाचे आता लक्ष गेले असून यंत्रणा सुस्थितीत आणण्याची गडबड दिसून येत आहे. तसेच राज्यात ऑक्सिजन पुरावठ्याची बोंब उडाली आहे. राज्यातील २८३ ऑक्सिजन प्रकल्प अपूर्ण असल्याचे माध्यमांच्या तपासणीत समोर आले आहे.
मुंबईत एकूण १७ ऑक्सिजन प्रकल्प आहेत. मात्र या १७ प्रकल्पांपैकी सातच ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित आहेत. तसेच दीडशे खाटांच्या रुग्णालयाकडून प्रकल्प उभारणी रखडली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात विद्युत जोडणी अभावी शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट धूळखात पडले आहेत. जिल्ह्यातील कळंब, परंडा, तुळजापुर व उमरगा येथील शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन निर्मितीसाठी प्लांट बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र महावितरणने कळंब व परंडा येथील प्लांटला स्वतंत्र रोहित्र बसवून न दिल्याने ऑक्सिजन निर्मितीचे हे प्लांट बंद आहेत. तसेच तुळजापुर आणि उमरगा येथील प्लांट देखील योग्य विद्युत पुरवठा होत नसल्याने बंदच आहेत. मात्र महावितरण आणि लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना नागपूरमध्ये ऑक्सिजनचे १५ जम्बो प्लांट लावण्याचे काम सुरू झाले मात्र अद्यापही एकही काम पूर्णत्वास आले नसल्याची माहिती समोर आली आहे.