पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यापैकी संपत्तीत वरचढ कोण?

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यापैकी संपत्तीत वरचढ कोण आहे याचा खुलासा शपथपत्रात त्यांनी दिलेल्या माहितीवरून झालाय.
परळी मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भावाबहिणींमध्येच लढत होणार असल्याने नेमकं यांच्यात कोण वरचढ ठरेल, याबद्दल उत्सुकता आहे. दोघांनीही गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या संपत्तीबद्दलची माहिती पुढे आली आहे.
पंकजा मुंडे या त्यांचे भाऊ आणि राजकीय विरोधक धनंजय मुंडे यांच्यापेक्षा संपत्तीने पुढे आहेत.
हे ही वाचा – परळीत मुंडे भाऊ बहिणीची बिग फाईट!
शेती आणि समाजसेवेच्या माध्यमातून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा केल्याचं आपल्या शपथपत्रात म्हटलं आहे.
पंकजा मुंडे यांनी शपथपत्रात नमूद केलेली एकूण संपत्ती पाच कोटी 54 लाख 54 हजार 72 रुपये आहे. धनंजय मुंडे यांची संपत्ती तीन कोटी 65 लाख 61 हजार 244 रुपये इतकी असल्याचं नमूद करण्यात आलंय.
त्यामुळे संपतीच्या बाबतीत बहीण ही भावापेक्षा वरचढ असल्याचं स्पष्ट होतंय.
शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार पंकजा मुंडे यांच्याकडे एकही वाहन स्वतःच्या नावावर नाही. 25 लाख 40 हजार रुपयांची एक BMW गाडी त्यांच्याकडे असली, तरी ती त्यांच्या स्वतःच्या नावावर नाही. तर धनंजय मुंडे यांच्या नावावर दोन ट्रॅक्टर आणि दोन चारचाकी वाहने आहेत.
पंकजा यांच्याकडे 450 ग्राम सोनं आणि 4 किलो चांदी असून दीड लाख रुपयांचे जडजवाहीर असल्याचं नमूद करण्यात आलंय. त्यांचे पती चारुदत्त पालवे यांच्याकडे 14 कोटी 33 लाख 55 हजार 429 रुपयांची संपत्ती आहे.
पंकजा मुंडे यांनी शेअर्स मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. धनंजय मुंडे यांनी शेअर्स आणि शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. त्यांच्या नावावर 3 कोटी 65 लाख 61हजार 244 रुपये जंगम तर 1कोटी 14 लाख 90 हजार 522 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्याकडे 2 कोटी 20 लाख 90 हजार 964 रुपयांची जंगम आणि 25 लाख 14 हजार 635 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध एकही प्रलंबित खटला किंवा गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र धनंजय मुंडे यांच्यावर विविध आंदोलने तसेच ‘संत जगमित्र साखर कारखाना’ अशा प्रकरणातील नऊ गुन्हे दाखल आहे.
यावरून परळीतली लढत ही कोट्यधीश बहीण भावामधील आहे अशी चर्चा सुरू झालीय.