Sat. Nov 27th, 2021

पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंवर टीकास्त्र

बीड जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीची माहिती देण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये पंकजा यांनी परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनाही लक्ष्य केलं आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळं औषधे आणि आरोग्य सुविधांची टंचाई अधिक भेडसावू लागली आहे. जिल्ह्याजिल्ह्यात हीच परिस्थिती आहे. कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचाही तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिलं असून बीड जिल्ह्याकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. हे पत्र ट्वीट करताना पंकजा यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता बोचरी टीका केली आहे.

आरोग्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र पंकजा यांनी ट्वीट देखील केलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी बीड जिल्ह्यातील सध्याच्या परिस्थितीची माहिती टोपे यांना दिली आहे. ‘बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ७२९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३४ हजार ९८९ लोक बाधित झाले आहेत. आरोग्य यंत्रणा अहोरात्र काम करत असली तरी रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुरेशी लस नसल्याने लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. या साऱ्याकडे आपण जातीने लक्ष द्यावे आणि रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे’, अशी विनंती पंकजा मुंडे यांनी केली आहे.

‘राज्याला मिळालेल्या लसीच्या दोन लाख डोसेसपैकी बीड जिल्ह्याला मिळालेल्या डोसची संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. हे अतिशय खेदकारक आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लसीचे पुरेसे डोस उपलब्ध करून द्यावेत,’ असंही पंकजा यांनी म्हटलं आहे. ‘बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे, जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत,’ असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे यांना सणसणीत टोला हाणला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *