‘पटोलेंचे पंतप्रधानांविषयीचे वक्तव्य भयंकर’ – प्रवीण दरेकर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वकत्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेले वक्तव्य भयंकर असल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत. त्यामुळे याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी दरेकर यांनी केली आहे. राजकारणात विरोधकांना बोलू शकतो, मात्र कोणाला मारण्याचे वक्तव्य करणे हे अतिशय गंभीर आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी पंतप्रधानांविषयी केले वक्तव्य हा प्रकार दुर्दैवी आणि चिंताजनक असून प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून ते अशी वक्तव्ये करत आहेत, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
पंतप्रधान हे एका पक्षाचे नसतात तर संपूर्ण देशाचे असतात. त्यामुळे त्यांच्याकडे तिरस्कारच्या दृष्टीने बघणे योग्य नाही. पटोले प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्यांची वक्तव्ये पक्षाचे वक्तव्य ठरत आहेत. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी दरेकरांनी केली आहे.
पंतप्रधानांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान
भंडारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारसभेच्या भाषणामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले. मी मोदीला मारुही शकतो आणि शिव्याही देऊ शकतो, असे वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना केले. मात्र नाना पटोले यांचे वक्तव्य वादात सापडले आहे.