Thu. Jul 9th, 2020

पेस्ट कंट्रोलने घेतला वृद्ध दाम्पत्याचा जीव

अमोल धर्माधिकारी, पुणे

तुम्ही तुमच्या घरात पेस्ट कंट्रोल केल्यानंतर योग्य ती खबरदारी घ्या. कारण पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घरात योग्य ती खबरदारी न घेतल्याने पुण्यात दाम्पत्याचा मृत्यू झालाय. बिबवेवाडी परिसरातील गणेश विहार सोसायटीत ही घटना घडलीय.

अविनाश मजली (वय ६४) आणि अपर्णा मजली (वय ५४) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मजली दाम्पत्याने मंगळवारी घरात पेस्ट कंट्रोल केले आणि खबरदारी म्हणून ते नातेवाईकांच्या घरी गेले होते. दरम्यान सायंकाळी घरी परत आले. परंतु पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घ्यावी लागणारी खबरदारी मात्र त्यांनी घेतली नाहीत. घराची खिडक्या, दारे उघडले नाहीत. पंखा चालू न करता टीव्ही पहात बसले. काही वेळाने चक्कर येऊन दोघेही खाली पडले. मुलीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

पेस्ट कंट्रोल हे दोन गोष्टींसाठी केले जाते, आणि याची प्रक्रिया देखील वेगळी असते. झुरळ आणि ढेकूण मारण्यासाठी वेगवेगळ्या औषधांचा वापर केला जातो. सध्या पेस्ट कंट्रोल कंपन्यासुद्धा बेकायदेशीरपणे काही घातक पदार्थ किंवा औषधें वापरुन पेस्ट कंट्रोल करतात आणि त्यामुळे अश्या जीवघेण्या घटना घडतात असं पेस्ट कंट्रोलवाल्यांनी म्हटलंय. त्यामुळे पेस्ट कंट्रोल करताना योग्य कंपनीकडून करुन घेतली पाहिजे.

पेस्ट कंट्रोल करताना काय काळजी घ्यावी?

पेस्ट कंट्रोल केल्यानंतर कमीत कमी 24 तास घर बंद ठेवावं.

झुरळ मारण्यासाठी पेस्ट कंट्रोल केले असेल तर कमीतकमी 12 तास किचन बंद ठेवावं.

किचनमधील भांडी, पाणी, अन्यधान्य, वापरावयाचे वस्तू झाकून ठेवव्या.

ढेकूण मारण्यासाठी पेस्ट कंट्रोल केली असल्यास 24 तास घरात प्रवेश करू नये.

संपूर्ण औषधाची माहिती करुन घ्यावी मगच पेस्ट कंट्रोल करावे.

काही दिवसांपूर्वी पुण्यातीलच भारती विद्यापीठ आणि सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतही अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. पेस्ट कंट्रोल केल्यानंतर योग्य ती खबरदारी न घेतल्याने बीड वरून काम करण्यासाठी आलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाला होता. तर सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतही अशीच घटना घडली होती.

सध्या या प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे. पेस्ट कंट्रोल केल्यानंतर न घेतलेल्या काळजीमुळे आज मजले दाम्पत्याना त्यांचा जीव गमवावा लागलाय, त्यामुळे तुम्ही देखील पेस्ट कंट्रोल करताना योग्य ती खबरदारी घ्या आणि योग्य कंपनीकडूनच पेस्ट कंट्रोल करुन घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *