सीएनजी दरात वाढ

सीएनजी प्रतिकिलो ८ रुपयांनी महागला आहे. आयात होणार वायू महागल्यामुळे सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून सीएनजीचे दर पुन्हा वाढले आहे.
सीएनजीचे दर मंगळवारी मध्यरात्रीपासून पुन्हा शहरात ६२.२० रुपये प्रति किलोवरून ६८ रुपये प्रति किलोपर्यंत वाढणार आहे. सीएनजी गॅसच्या मिश्रणात एका विशिष्ट आयातित वायूच्या वाढीमुळे सीएनजीत वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या विशिष्ट गॅसची आंतरराष्ट्रीय किंमत दुप्पट झाली आहे.
पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ
गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलमध्ये वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. अशातच, आजही इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा एकदा गगनाला भिडले आहेत. गेल्या १६ दिवसांत १४ वेळा इंधन दरवाढ करण्यात आली आहे. इंधनाच्या दरात सतत होणारी वाढ आता सर्वसामान्यांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा इंधनाच्या दरात वाढ केली आहे. मुंबईत पेट्रोल ८४ पैशांनी महागले असून पेट्रोलचे दर १२० रुपये ५१ पैसे प्रतिलिटर झाले आहे. तर डिझेल ८५ पैशांनी महागले असून डिझेलची किंमत १०४ रुपये ७७ पैसे प्रतिलिटर झाली आहे.