एकेकाळचे खांद्याला खांदा लावून उभे ठाकरे बंधू राज आणि उद्धव ठाकरे पक्षातील नेतृत्वासाठीच्या संघर्षामुळे 2005 मध्ये वेगळे झाले. पण 2025 मध्ये, भाषिक अस्मितेच्या मुद्यावर त्यांनी पुन्हा एकत्र येत महाराष्ट्राला आश्चर्यचकित केलं.
बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेच्या नेतृत्वासाठी राज ठाकरे यांची अपेक्षा होती, पण कार्याध्यक्षपद उद्धव यांना मिळाल्याने वाद निर्माण झाला. त्यामुळे राज यांनी शिवसेना सोडून ‘मनसे’ या नव्या पक्षाची स्थापना केली.
पक्ष वेगळे झाल्यावर राज आणि उद्धव यांच्यात टीका-प्रत्यटीकेचा सूर वाढला. उद्धव यांना ‘मुलायम’ तर राज यांना ‘संवेदनशीलतेचा अभाव’ असल्याचं म्हणत एकमेकांवर वैचारिक हल्ले झाले. हा संघर्ष निवडणुकांमध्ये ठळकपणे दिसून आला.
2019 मध्ये उद्धव यांनी भाजपपासून दूर जात महाविकास आघाडी स्थापन केली, तर राज यांनी भाजपसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. पण दोघांच्याही वाट्याला अपूर्णतेचा अनुभव आला आणि याच अनुभवाने त्यांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडलं.
2025 मध्ये इयत्ता 1 ते 5मध्ये हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधूंनी संयुक्तपणे मोर्चा पुकारला. ही बाब इतकी ठळक ठरली की त्यांनी जुन्या मतभेदांना बाजूला ठेवून पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला.
राज आणि उद्धव यांनी घेतलेल्या भूमिका आणि जनतेच्या दबावामुळे शासनाने GR रद्द केला.त्यानंतर मोर्चा रद्द करून ‘विजयी मेळावा’ आयोजित केला गेला आहे; जिथे दोघेही एका मंचावर उभे राहून मराठी अस्मितेचा विजय साजरा करणार आहेत.
ठाकरे बंधूंच्या संबंधांची ही एक नवी पायरी ठरणार की क्षणिक युती? हे काळच ठरवेल. मात्र आज, या मेळाव्याने महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आशेचा आणि मराठी अस्मितेचा एक नवा सूर नक्कीच जागा होणार आहे.