Tue. Dec 7th, 2021

महिलांसाठी खुशखबर! नाशिकमध्ये धावणार आता ‘पिंक रिक्षा’…

नवी दिल्ली, मुंबई, पुण्यानंतर आता नाशिक शहरातील रस्त्यांवरही आता ‘पिंक रिक्षा’ धावणार आहेत. शहरातील महिलांना स्वयंपूर्णतेकडे नेण्यासोबतच त्यांना प्रवासात सुरक्षेची हमीदेखील ‘पिंक रिक्षा’मुळे मिळते.

शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने महिला आणि विद्यार्थिनींकडून प्रवासासाठी खासगी रिक्षांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु, या रिक्षांमधून प्रवास करताना महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शहरात रिक्षामध्ये महिलांची छेडछाड होण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. म्हणूनच महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पिंक रिक्षा या नावाची संकल्पना पुढे आली आहे.

महिलांसाठी स्वतंत्र अशी वाहतुकीची व्यवस्था आणि तीही महिलांनीच चालवलेली अशी ही संकल्पना नवी दिल्ली, मुंबई आणि पुण्यात राबवली जातेय.

त्यामुळे नाशिकमध्येही अशी योजना हिमगौरी आहेर-आडके यांनी स्थायी समिती सभापती असताना मांडली होती.

सभापतीपदावर असतानाच त्यांनी महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता.

त्याअंतर्गत महिलांना पिंक रिक्षा चालविण्याकरिता प्रशिक्षण आणि परवाने उपलब्ध करून देण्यासाठी आहेर-आडके यांनी सन 2019-20 मध्ये भरघोस निधीची तरतूदही केली होती.

प्रशासकीय पातळीवर या योजनेचा अभ्यास केल्यानंतर या योजनेची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे.

स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला मूर्त स्वरूप आलं असून, महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून शहरातील महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण व परवाने दिले जाणार आहेत.

महापालिकेच्या बजेटमध्ये यासंदर्भातील तरतूद करण्यात आल्यानंतर महापालिकेने या योजनेचा प्रारंभ केला असून, गरजू महिलांकडून प्रशिक्षण व परवान्यासाठी अर्ज मागविले आहेत.

अर्ज करण्यासाठी महिलांना आवाहन

महिला व बालकल्याण विभागाच्या अखत्यारित महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण देण्याच्या उपक्रमांतर्गत पिंक रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे.

त्यासाठी इच्छुक महिलांकडून अर्ज मागविण्यासही सुरुवात केली आहे.

ज्या महिलांना असे प्रशिक्षण हवे असेल, त्यांनी महापालिकेकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन महिला व बालकल्याण विभागाकडून करण्यात आले आहेत.

त्यासाठी अर्ज महापालिकेच्या अधिकृत Website वर आहे.

तसंच महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनातील महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. परिपूर्ण भरलेले अर्ज कागदपत्रांसह या कार्यालयात 30 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *