Tue. Dec 7th, 2021

पराभवानंतर ‘जन की बात’…शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी ?

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह 5 राज्यातील पराभवामुळे हादरलेल्या मोदी सरकारकडून शेतकरी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तब्बल 4 लाख कोटींच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

2 लाख 63 हजार शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. तळागाळातील जनतेला आकर्षित करण्यासाठी सरकारच्या वतीने अनेक ठोस पावलं टाकले जातील असेही सांगण्यात येते. दरम्यान विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर पंतप्रधान मोदी हे आज म्हणजेच गुरुवारी खासदारांशी संवाद साधणार आहेत.

तीन राज्यात मिळालेल्या अपयशामुळे भाजपामध्ये खळबळ माजली आहे. या राज्यातील शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना भाजपाला करावा लागल्याचे निकालावरुन दिसत आहे. याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता गृहीत धरुन पराभव भरून काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्जमाफीसारखा मोठा निर्णय घेऊ शकतात.

यापूर्वीच्या यूपीए सरकारनेही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. पण त्या कर्जमाफीच्या तुलनेत मोठी कर्जमाफी मोदी सरकार करु शकते. पण यासाठी आर्थिक तरतुदीचे मोठे आव्हान मोदी सरकारसमोर असेल. कारण गेल्या 6 महिन्यात जीएसटीमार्फत निश्चित करण्यात आलेले उत्पन्न गाठण्यात फक्त दोनवेळाच यश आले आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी, युवक, मागासवर्गीय, दलित आणि आदिवासी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोदी सरकार पावले उचलणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *