Sat. Jun 12th, 2021

भाजपाच्या स्थापनादिनानिमित्त पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल

देशातला सध्याचा सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेला भाजप आज ४१ वा स्थापना दिवस साजरा करत आहे. भाजपच्या स्थापना दिवसानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीच्या भाजपच्या कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले.

भाजपाच्या स्थापनादिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. भाजपा सरकारच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या कामांची, योजनांची माहिती देतानाच मोदी यांनी शेतकरी आंदोलन, सुधारित नागरिकत्व कायद्यावरही भूमिका मांडली. निवडणुकांमधील विजयावरून भाजपावर होणाऱ्या टीकेलाही पंतप्रधान मोदी यांनी उत्तर दिलं. ‘भाजपा निवडणूक जिंकण्याचं मशीन नाही, तर देशातील नागरिकांची मनं जिंकण्याचं अभियान आहे,’ असं सांगत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना उत्तर दिलंय.

भाजपाच्या ४१व्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी देशातील भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले, “मागील वर्षी करोनानं संपूर्ण देशसमोर अभूतपूर्व असं संकट उभं केलं होतं. तेव्हा भाजपा कार्यकर्त्यांनी आपलं सुख-दुःख विसरून देशवासियांची सेवा केली. ‘सेवा हेच संघटन’ याचा संकल्प केला आणि त्यासाठी काम केलं. गांधीजी म्हणायचे समाजातील शेवटच्या स्तरातील व्यक्तीला लाभ होईल तेच निर्णय आणि योजना आहे. गांधींजींच्या त्याच भावनेला पूर्ण करण्यासाठी आपण परिश्रम घेत आहोत,” असं मोदी म्हणाले.

“आमच्या सरकारचं मूल्याकंन लोकांना दिल्या जाणार लाभावरून होत केलं जात आहे. देशातील सरकारच्या कामकाजाचं मूल्यमापन करण्याचा हा मूलमंत्र बनला आहे. मात्र, तरीही भाजपा निवडणूक जिंकली की, तर भाजपाला निवडणूक जिंकण्याचं मशीन म्हटलं जातं. असं म्हणणाऱ्या लोकांना लोकशाहीची परिपक्वता कळालेली नाही. भाजपा सत्तेत असो वा विरोधी बाकांवर,पक्षाने जनतेशी नाळ कायम ठेवली आहे. कार्यकर्ते भाजपाला ताकद देतात. जनतेमध्ये राहून काम करतात. पक्षाची ताकद वाढवतात. आपलं आचरण आणि प्रयत्नांनी भाजपा कार्यकर्ते जनतेचं मन जिंकण्याचं काम अविरतपणे करत आहेत. कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळेच भाजपा आज जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे,” असं मोदी यांनी म्हटलं.

“केरळ आणि बंगालमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले केले गेले. घराणेशाहीचं काय हाल झाले आहेत? हे नवा भारत बघत आहे. प्रादेशिक पक्षसुद्धा एक कुटुंब आणि काही लोकांपुरतेच मर्यादित झाले आहेत. त्यांच्या समाजवादाचा अर्थ काही लोकांसाठी योजना आणि व्होट बॅंकेसाठी धोरणं आखणं इतकाच होता. हेच पक्ष आता कृषी कायदे आणि सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल करत आहेत,” अशी टीका मोदी यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *