Jaimaharashtra news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणीची घोषणा केली होती. या घटनेला आज ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत काँग्रेवर हल्लाबोल केला आहे.

‘आणीबाणीच्या त्या काळ्या दिवसाला विसरता येणार नाही. १९७५ ते १९७७ या काळात संस्थांचा नाश झाला. आपण भारतीय लोकशाही भावनांना बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प करूया आणि राज्यघटनेत नमूद केलेल्या मूल्यांचे पालन करुया’, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

‘कॉंग्रेसने आपल्या लोकशाही विचारांना चिरडले. आणीबाणीला विरोध दर्शविणारे आणि भारतीय लोकशाहीचे रक्षण करणारे सर्व महान लोक यावेळी आम्हाला आठवतात’, असंदेखील पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडूनही काँग्रेसवर टीका

‘१९७५ च्या या दिवशी कॉंग्रेसने सत्तेच्या स्वार्थापोटी आणि अहंकाराने देशावर आणीबाणी लादून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची हत्या केली होती’, असं ट्विट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे.

‘असंख्य सत्याग्रह्यांना तुरूंगात टाकण्यात आले आणि प्रेसदेखील बंद केले गेले. नागरिकांचे मूलभूत हक्क काढून घेऊन संसद आणि न्यायालयाला निःशब्द प्रेक्षक बनवले. एका कुटुंबाच्या विरोधात उठणारा आवाज शांत करण्यासाठी लावण्यात आलेली आणीबाणी हा स्वतंत्र भारताच्या इतिहासाचा एक गडद अध्याय आहे. देशाच्या संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी अविरत लढा देणाऱ्या सर्व देशवासियांच्या त्याग आणि बलिदानाला सलाम’, असंदेखील शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Exit mobile version