पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत ‘जनता कर्फ्यू’चं आवाहन

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलंय. भारतात आत्तापर्यंत या Corona Virus चे 4 बळी गेले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं.
काय म्हणाले नरेंद्र मोदी?
जग एका मोठ्या संकटातून जातंय. दोन्ही महायुद्धांनी जगाला जितकं नुकसान झालेलं नाही, तेवढं नुकसान या महामारीमुळे झालं आहे. अशा परिस्थितीत आपल्याला काहीच होणार नाही, अशा भ्रमात देशवासियांनी राहू नये. आपली काळजी घेणं आवश्यक आहे.
देशवासियांनी मला आत्तापर्यंत कधी निराश केलेलं नाही. आज मी आपल्याकडे काही मागण्यासाठी आलोय. मला तुमचा येणारा काळ हवा आहे. या काळात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या म्हणजे संकल्प आणि संयम. संयम बाळगून प्रत्येक नागरिकाने सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं. त्यामुळे यामुळे येत्या दोन आठवड्यात शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. ऑफिस, व्यवसाय याची कामं घरातून करण्याचा प्रयत्न करा. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या आरोग्य सेवा, माध्यमं यांना घरातून काम करणं अशक्य आहे. तरीही लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये.
22 मार्च रोजी जनता कर्फ्यू
22 मार्च रोजी रविवारी जनता कर्फ्यूची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. जनता कर्फ्यू म्हणजे स्वयंशिस्तीने जनतेने जनतेसाठी लावलेला कर्फ्यू. या दिवशी सकाळी 7 ते रात्री 9 दरम्यान कुणीही घराच्या बाहेर पडू नये. याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता 5 मिनिटांसाठी आपल्या दारात किंवा खिडकीतून टाळ्या वाजवून अथवा थाळी वाजवून देशवासियांसाठी कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टर्स, नर्स, पोलीस, ड्रायव्हर तसंच माध्यमकर्मी अशा राष्ट्ररक्षकांचे आभार मानावे, असं पंतप्रधान यांनी म्हटलं आहे.
आर्थिक ताण पडणार
या प्रकाराचा ताण अर्थव्यवस्थेवर पडणार आहे. त्यासाठी कोविड 19 इकोनॉमिक टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार आहे. या परिस्थितीत अनावश्यक आरोग्य चाचण्या करू नयेत. अत्यावश्यक वस्तूंची साठेबाजी करू नका आणि दूध, औषधं आदी अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा सरकार पडू देणार नाही, असा विश्वास मोदींनी दर्शवला आहे.