Mon. Sep 27th, 2021

‘हरिद्वारचा कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवा’

देशात कोरोनाचं संकट असताना उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये महाकुंभमेळा सुरू आहे. देशभरातून भाविक कुंभमेळ्यासाठी दाखल झाले असून, लाखो भाविक हरिद्वारमध्ये जमले आहेत. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. यावेळी मोदींनी कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने करण्याची विनंती केली आहे.

हरिद्वारमधील कुंभमेळ्यात कोरोनाचा शिरकाव झाला असून, अनेक साधू आणि भाविकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुना आखाडाचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याकडे कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने करण्याचं आवाहन केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. ‘आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी आज फोनवरून संवाद साधला. सर्व संतांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. सर्व संत प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करत आहेत. याबद्दल मी संतांचे आभार व्यक्त केले. त्याचबरोबर मी विनंती केली की, दोन शाही स्नान झाले आहेत आणि कोरोनाच्या संकटामुळे कुंभमेळा आता प्रतिकात्मक पद्धतीने व्हावा. यामुळे संकटाशी लढण्याला ताकद मिळेल’, असं आवाहन मोदी यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *