पंतप्रधान मोदींनी केलं ज्योतिरादित्य शिंदेचं कौतुक

भाजपाचे राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. मोदींनी राज्यसभेमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाबद्दल त्यांचे आभार मानाणारं भाषण दिलं. यामध्ये मोदींनी ज्योतिरादित्य यांचा उल्लेख करत आमचे माननीय खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी कृषी काद्यांबद्दल सविस्तर भाष्य केल्याचं सांगितलं आहे. त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने आपले मुद्दे मांडले, अशा शब्दांमध्ये मोदींनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या संसदेमधील भाषणाचं कौतुक केलं. शिवाय ज्योतिरादित्य शिंदे यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसेवर टीका केली. ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्याच्या भाषणात म्हटलं, शेतकऱ्याला आपण अन्नदाता म्हणतो. मात्र शेतकरी एखाद्या जिल्ह्याच्या, राज्याचा नाही तर संपूर्ण विश्वाचा अन्नदाता आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे. मात्र २६ जानेवारी रोजी जे काही घडलं ते आपण सर्वांनी पाहिलं, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसला खडे बोल सुनावले.
त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्याच घोषणापत्रामध्ये कृषी कायद्यांचा उल्लेख केला आणि म्हटलं. “आज जे लोकं कृषी कायद्यांचा विरोध करत आहे त्यांना मी सांगू इच्छितो की या देशामध्ये २०१९ साली काँग्रेसच्या घोषणापत्रामध्ये कृषी कायद्यांचा उल्लेख करण्यात आला होता. शेतकऱ्यांसोबत सरकारने नक्कीच चर्चा करायला हवी. सरकारने हे कायदे १८ महिन्यांसाठी स्थगित करण्याचा निर्णयही घेतला आहे. कधी काळी काँग्रेस अशा कायद्यांची वकिली करायची मात्र आता ते यालाच विरोध करत प्रश्न उपस्थित करत आहेत. २०१९ मध्ये काँग्रेसच्या घोषणापत्रामध्ये या कायद्यांचा उल्लेख होता. शरद पवार यांनी कृषी कायद्यांसदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं. मात्र आज हेच लोकं कृषी कायद्यांना विरोध करत आहेत,” असं ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या भाषणात म्हटलं.