सर्वसामान्यांना 10 रुपये किलोने कांदा विकणाऱ्यांना अटक, कारण…

सध्या देशभरात कांद्याच्या दराने सर्वसामान्यांना रडवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचा दर शंभरी पार करतोय. रोजच्या आहारात कांदा खाणाऱ्यांच्या तोंडचं पाणी यामुळे पळालंय. पुन्हा कांदा स्वस्त कधी होणार, याची वाट लोक पाहात आहेत. मात्र एका ठिकाणी 2 तरुणांनी अगदी कमी म्हणजे थेट 10 ते 20 रुपये दराने सामान्य जनतेला कांदा उपलब्ध करून दिला. मात्र त्यांना काही काळातच हा उद्योग त्यांना आटोपता घ्यावा लागला, कारण पोलिसांनी त्यांना अटक केली.
काय घडलं नेमकं?
देशभरात कांदा 100 ते 200 रुपये किलो एवढा महागल्यामुळे लोक त्रस्त झाली आहेत.
कांदा महागला तरी शेतकऱ्यांना काहीही फायदा होत नाही.
सामान्य लोकांच्या तर आहारातून कांदा गायबच झाला आहे.
हा सर्व प्रकार पाहून ग्वाल्हेरजवळ 2 तरुणांनी उपाय शोधला.
सर्वसामान्यांना पुन्हा स्वस्तात कांदा मिळावा यासाठी त्यांनी एका कांदा व्यापाऱ्याचं गोदामच लुटलं.
50 किलो कांद्याच्या 12 पोत्यांवर डल्ला मारत 60 हजार रुपयांचा कांदा त्यांनी पळवला.
तसंच लसणीचीही 2 पोती त्यांनी लांबवली.
हा कांदा त्यांनी बाजारात थेट 10 रुपये किलो दराने विकायला सुरुवात केली.
सगळीकडे 80 ते 100 रुपये किलो किमतीने कांदा विकला जात असताना या तरुणांकडे 10 रुपये किलो किमतीने कांदा मिळतोय, हे कळल्यावर या तरुणांकडे खरेदीसाठी एकच झुंबड उडाली.
कांदा महागला असताना बाजारात एका ठिकाणी एवढ्या स्वस्तात कांदा मिळतोय, ही बातमी पोलिसांना कळताच त्यांना संशय आला.
ते तरुणांची चौकशी करण्यासाठी त्यांना शोधू लागले. मात्र तोपर्यंत सगळा कांदा विकून दोघे तरूण निघून गेले होते.
मात्र पोलीस चौकशी करत करत अखेर त्यांच्यापर्यंत पोहोचलेच. दोघांची चौकशी केल्यावर आपण कांदा चोरल्याचं त्यांनी कबूल केलं. अखेर दोघांना पोलिसांनी आता अटक केली आहे.