काकाची सुपारी देणाऱ्या पुतण्याला पोलिसांनी गुन्ह्याआधीच ‘असं’ केलं अटक

काकाची हत्या करण्यासाठी सुपारी देणाऱ्या पुतण्यासह 6 आरोपींचा डाव वसई पोलिसांनी उधळून लावलाय. हत्येची तारीख बदलल्यामुळेच व्यापारी काकाचा जीव वाचल्याचं पोलिसांनी म्हटलंय. नालासोपारा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, एका व्यापाऱ्याच्या हत्येसाठी सुपारी देण्यात आली आहे. या व्यापाऱ्याची लवकरच हत्या केली जाणार आहे. ही माहिती मिळाल्यानंतर वसई युनिटच्या टीमने वेगवेगळ्या ठिकाणांहून 6 जणांना ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवल्यावर खरी माहिती उजेडात आली.
नालासोपारा शहरात राहणारे रोशनलाल गुप्ता हे व्यापारी आहेत.
परिसरातील बेकऱ्या आणि अनेक दुकानांना होलसेल भावात तेल आणि मैदा पोहचवण्याचा व्यवसाय करतात.
त्यांचा पुतण्या मिथिलेश गुप्ता उर्फ मॉन्टी याचासुद्धा हाच व्यवसाय असून तो याच परिसरात करत होता.
काका आणि पुतण्या या दोघांमध्ये याच व्यवसायावरून वाद असल्याने भांडणं होत होती.
काही महिन्यांपासून पुतण्या मिथिलेश हा आजारी असल्याने तो एका मांत्रिकाकडे गेला होता.
त्या मांत्रिकाने सांगितले की, तुझ्या काकाने तुझ्यावर जादूटोणा आणि करणी केली आहे.
हे ऐकून संतापलेल्या पुतण्याने काकाची हत्या करण्याचा डाव आखून हत्येची सुपारी देण्याचा विचार केला होता.
त्याने नालासोपाऱ्यातील बेकरीमध्ये काम करणाऱ्या फिरोज शराफत अन्सारी याला काकाच्या हत्येची 2 लाख रुपयांची सुपारी देऊन 10 हजार रुपये ऍडव्हान्स दिले.
अन्सारीने हत्येसाठी मोहम्मद परवेज अन्सारी, अजय बिडलान, रिजवान जमाल खान आणि मंगलू गुप्ता त चार मित्रांना तयार केले.
काकाला दाखवण्यासाठी पुतण्या या पाचही आरोपींना 1 सप्टेंबरला नालासोपारा पूर्वेकडील विजयनगर येथे घेऊन गेला होता.
त्या सर्वांना लांबूनच काकाला दाखवून हत्येसाठी तारीख आणि वेळ पुतण्याने ठरवली.
पण काहींना काही अडचण येत असल्याने अनेक वेळा हत्येच्या तारखा आणि वेळ बदली झाल्या.
या गोंधळामुळे हत्या करण्यात आरोपींना यश आलं नाही.
दरम्यान खबरीकडून पोलिसांना माहिती मिळाल्यावर हत्येचा डाव उधळून लावला.
पोलिसांनी 6 आरोपींना अटक करत व्यापारी काकाचा जीव वाचवला आहे.