Sun. Jun 13th, 2021

संतापजनक! तरुणीच्या हत्येचा उलगडा, पोलिसाचंच कारस्थान

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात प्रेम प्रकरणातून सहा जानेवारीला एका 18 वर्षीय महाविद्यायलीन तरुणीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. हे निर्घृण कृत्य केल्यानंतर या माथेफीरूने स्वतःवरही चाकूने वार करून घेतले होते. मात्र या दरम्यान आपल्या मुलीच्या हत्येमागे ठाणेदारच असल्याचा धक्कादायक आरोप तरुणीच्या आईने केला होता. त्यानंतर रवींद्र सोनवणे या ठाणेदाराचे निलंबन करून चौकशी करण्यात आली, तेव्हा संतापजनक घटनेचा पर्दाफाश झाला. ‘वॉण्टेड’ सिनेमात ‘तळपदे’ हे खलनायकी पात्र ज्या प्रकारे रंगवण्यात आलं होतं, तसाच गुन्हेगारी वृत्तीचा पोलीस प्रत्यक्षात समोर आला.

मंगळवारी या चौकशीचा अहवाल समोर आला असून ठाणेदार रवींद्र सोनवणे याने मुलीच्या घरी जाऊन तिच्याशी जवळीक साधल्याचे चौकशी अवहालातून समोर आलं. या प्रकरणी आरोपी ठाणेदार रविंद्र सोनवणे याला पोलिसांनी अटक केली आहे. सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्याच एका पोलीस अधिकाऱ्यांने एका तरुणीचा छळ केल्याने आता पोलिसांच्याच विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तरुणीच्या हत्येच्या काही दिवसांपूर्वी मुख्य आरोपी सागर तितुरमारे याच्या विरोधात तक्रार देऊनही ठाणेदार रवींद्र सोनवणे यांनी कुठलीही कारवाई केली नाही, असा आरोप पीडित तरूणीच्या आईने केला. जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे ठाणेदार रवींद्र सोनवणे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. ठाणेदार यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.

हत्येच्या काही दिवसाअगोदर पासून ठाणेदार हा माझ्या मुलीला भेटायला व जबरदस्तीने जेवायला घरी येत होता. तसंच तो तिला वारंवार फोन करून त्रासही देत होता. तिला कॉलेज मध्ये भेटायला जात होता. वेगवेगळ्या नंबरवरून ठाणेदार माझ्या मुलीला त्रास देत होता असाही गंभीर आरोप हत्या झालेल्या तरुणीच्या आईने केला होता.

त्यानंतर या हत्याकांडाचा तपास मोर्शीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फरताळे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. मागील अनेक दिवसांपासून या ठाणेदाराची चौकशी सुरू होती. या चौकशीचा अहवालमध्ये ठाणेदाराने त्या पीडित मुलीशी जवळीक साधल्याचं समोर आल्याने आता या ठाणेदाराला आरोपी सिद्ध करुन अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *