Mon. Dec 6th, 2021

रस्ता गेलाय चोरीला! नागपूर पोलिसांत अजब तक्रार…

आत्तापर्यंत पाकिट चोरीला गेल्याची तक्रार तुम्ही ऐकली असेल. मोबाइल चोरीला गेल्याचीही तक्रार तुमच्या कानावर पडली असेल. दागिने, मौल्यवान गोष्टी, सामानाची चोरी अनेकदा होत असते. मात्र नागपूरमध्ये पोलिसांकडे एक अजब तक्रार दाखल झाली आहे. ही तक्रार आहे चक्क रस्ता चोरीला गेल्याची.

ही कुठली ‘वाटमारी’?

भारतीय नगर परिसरात राहणाऱ्या म्हाडा कॉलनीच्या रहिवाशांनी रस्ता चोरीला गेल्याची तक्रार पोलिसात केली आहे.

मागील 24 वर्षांपासून रस्ता बनत नसल्याने त्रस्त म्हाडा कॉलनीच्या रहिवाशांनी हे पाऊल उचललंय.

शिवाय शासनाचा निषेध म्हणून आपल्या घरावर काळे झेंडे आणि बॅनरही लावले आहे.

म्हाडा आणि नागपूर सुधार प्रन्यास या दोन शासकीय विभागांकडून एकमेकांवर ढकलाढकलीच्या धोरणामुळे म्हाडा कॉलनीमधील रहिवासी गेले 24 वर्ष रस्त्याविना आहेत.

आता या सर्वानी शासनाविरोधात एल्गार पुकारत रस्ता चोरीची तक्रार दाखल केली आहे.

काय आहे रस्ताचोरीची कथा?

शहरातील भारतीय नगर परिसरात म्हाडाने 1995 मध्ये अत्यल्प उत्पन्न गटातील अनेक कुटुंबाना साडे चारशे चौरस फुटांचं घर दिलं होतं.

1995 च्या नकाशावर मंजूर असलेला आणि मुख्य बाजारपेठेपासून म्हाडा कॉलनीला जोडणारा 12 मीटर रुंदीचा रस्ता होईल, अशी अपेक्षा या नागरिकांना होती.

प्रत्येक वेळेला मागणी केल्यास 15 दिवसात तुमचा रस्ता बांधून देतो, असे आश्वासन राजकारण्यांकडून मिळत होते.

मात्र, रस्ता झालाच नाही.

हळूहळू या प्रस्तावित रस्त्याच्या बाजूला असलेल्या काही संस्थांनी आणि काही स्थानिक व्यापाऱ्यांनी प्रस्तावित रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण करत भिंत बांधून म्हाडा कॉलनीच्या लोकांचा ये जा करण्याचा मार्गच बंद केला. त्यामुळे स्थानिकांनी या समस्येला कंटाळून रस्ता चोरीला गेल्याची तक्रार देण्यासाठी पोलिसात धाव घेतली. या अजब तक्रारीमुळे पोलीसही चक्रावून गेले.

कसा निघणार ‘मार्ग’?

सुरुवातीला पोलिसांनी अशी तक्रार घेता येत नाही असा सूर लगावला.

मात्र रहिवाशांनी 1995 च्या मंजूर नकाशात असलेला रस्ता आज अस्तित्वातच नाही, या संदर्भातील योग्य कागदपत्रे पोलिसांना दाखवले.

तेव्हा पोलिसांनी त्यांची तक्रार स्वीकारली केली.

शिवाय पोलिसांनी रहिवाशांची समस्या म्हाडा आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांना पाठवून न्याय मिळवून देऊ, असे आश्वासनही दिले.

त्यामुळे भविष्यात या पीडितांना रस्ता सापडेल का हा महत्वाचा प्रश्न आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *