हेल्मेट नाही, म्हणून पोलिसानेच मारला डोक्यावर दांडुका!

हेल्मेट घातलं नाही म्हणून एक पोलीस कर्मचाऱ्यांने एक युवकाच्या डोक्यावर दंडुका मारून गंभीर जखमी केल्याची घटना नाशिक मध्ये घडली. या घटनेला सहा दिवस लोटले तरी अद्याप या संदर्भात गुन्हा दाखल झाला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
हेल्मेट घातलं नसल्याने डोक्यावर तडाखा!
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे.
जे नागरिक हेल्मेट घालत नाहीत अशा लोकांकडून मोठ्या प्रमाणात दंडदेखील वसूल करण्यात येतोय.
मात्र, हा सक्ती आता लोकांच्या जीवावर बेततेय की काय, असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
शुभम महाले हा युवक नाशिक रोड परिसरातून आपल्या घरी जात होता.
शुभमने हेल्मेट न घातल्यामुळे त्याला या परिसरात बंदोबस्तासाठी असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने हटकलं.
पोलिसाला घाबरून शुभम हा पुढे जात असताना पाठीमागून या पोलिस कर्मचाऱ्याने त्याच्या डोक्यावर दंडुका मारला.
त्यामुळे शुभम हा गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.
या घटनेनंतर शुभमचे नातेवाईकांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
मात्र अद्यापही यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
या संदर्भात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. हेल्मेटसक्ती करण्यात आली असली तरी या हेल्मेट्समुळे नागरिकांना त्रास देखील सहन करावा लागत आहे. अशातच पोलीस कर्मचारी हे दादागिरी करत असल्याचं देखील या घटनेमधून पाहायला मिळतंय.
शुभमची ही अवस्था करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. तसंच हेल्मेटसक्ती असावी, पण नागरिकांच्या जिवावर बेतणारी सक्ती नको अशीदेखील मागणी आता जोर धरू लागली आहे.