Fri. Sep 17th, 2021

नेत्यांची असंवेदनशीलता, कलाकारांची संवदेनशीलता…

महाराष्ट्रात 1 आणि 2 ऑगस्ट 2019 रोजी मराठवाडा वगळता सर्वत्र मुसळधार पाऊस पडला. मुंबईसह विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात या दोन-तीन दिवसात पावसाने जोरदार बॅटींग केली. यामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवनाव विस्कळीत झाले. या दिवसात पश्चिम महाराष्ट्र वगळता पावसाचा जोर ओसरला होता. परंतु पश्चिम महाराष्ट्रात पाऊस अक्षरशः धूमाकूळ घालत होता. कोल्हापूर, सांगली, सातारा, पंढरपूर, महाड, चिपळूण या ठिकाणी पाऊसाने रौद रुप धारण करत सगळयांना ‘सळो की पळो’ करुन सोडले. मुख्यत: कोल्हापूर, सातारा आणि सांगलीत पाऊस 2 ऑगस्टपासून पुढे 10 ते 11 तारखेपर्यंत पाऊस प्रचंड प्रमाणात पडला. परिणामी पाण्याच्या विसर्ग कमी झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी साचले. कोल्हापूर, चंदगड, आजरा, गडहिंग्लज, भुदगड, सांगली, भिलवाडी, शिरोळ, हतकंणगले, जयसिंगपूर, इत्यादी भागात जिकडे नजर जाईल तिकडे पाणीच पाणी.

शेतीतील पिके पूर्णतः पाण्याखाली गेली. गुरे ढोरे, जनावारे पाण्यात वाहून गेली, लघु उद्योग, शेती, दुध, ऑटोमोबाईल, वीज, दुकाने इत्यादींचे प्रचंड नुकसान झाले. विशेषत: कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला पावसाने 107 वर्षात जेवढे झोडपले नव्हते तेवढे या दिवसात पावसाने झोडपले. कित्येकानी अनेक रात्री पाण्यातच काढल्या. पूरग्रस्तांवर उपासमारीचे वेळ आली. जिकडे तिकडे पाण्याच्या महापूर… भयानक, भीषण आणि हाहाकार माजवणारा 107 वर्षानंतरचा महाभयंकार महापूर!

या 10-12 दिवसात काय नाही घडले? राज्यासह देशभरात प्रचंड घडामोडी घडल्या. तसेच अनेक लोकांचे खरे रुप सुद्धा पाहयला मिळाले. सगळीकडे सांगली कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात महापूर आल्याचे बातम्या झळकू लागल्या. मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा मध्येच सोडून कोल्हापूर दौ-याची पाहणी केली.

यावेळी सर्वात आधी चित्रपटसृष्टीमधून अभिनेता सुबोध भावे पूरग्रस्तासाठी पुढे येत स्वत: मदत करत असल्याचे तसेच इतरांना मदत करण्याचे आवाहन केले. परंतु त्याचवेळी मात्र शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मात्र आपल्या पक्षात प्रवेश देण्याची घाई लागली होती. माझ्या मनात एक तिरकस विचार म्हणून नेता आणि अभिनेता यांची तुलना होऊ लागली, आणि दोघांचेही वेगळी दर्शन घडले. ‘एक असंवेदनशील नेता तर, दुसरीकडे संवेदनशील अभिनेता’ असे चक्र डोक्यात फिरु लागले. गिरीश महाजन पूरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी गेले असता, त्यांना सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांच्यावर चौफेर टीका झाली.

दुसरीकडे कोल्हापूर आणि सांगलीतील महापुराच्या बातम्या वाचताना मन सुन्न व्हायचे. दिवसेंदिवस बळींची संख्या वाढत होती. कित्येकांचे संसार उद्धवस्त झाले. होत्याचे नव्हते झाले. लहान बाळाबरोबर त्याच्या आजीचा फोटो तर काळीज हेलावून टाकणारा होता. या महापुरात जात, धर्म, रंग हे सगळे भेदभाव विसरुन लोक एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न करताना दिसले. या भीषण महापुरात पुरग्रस्ताना हळूहळू मदतीचा ओघ सुरु झाला तेव्हा राजकारण्यांना सुद्धा जाग आली. अनेकांनी पश्चिम महाराष्ट्राचे दौरे केले. मात्र मदतकार्यात सर्वात जास्त दिसले ते मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार. कित्येकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत महिलांना सॅनेटरी पॅड, अंतर्वस्त्र तसेच मेडिसनच्या मदतीचे आवाहन केले व स्वत:ही मदत केली. परंतु याच काळात बॉलीवूडमधील एकही कलाकार पूरग्रस्तासाठी पुढे येताना दिसले नाहीत. हे कलाकार याच भूमीतील इथेच खाल्ले, वाढले, मोठे झाले, प्रसिद्धी मिळविली परंतु ज्या वेळी आपली मराठी माणसे महापुरामुळे मरत होती, त्यावेळी बॉलीवूडमधील मेलेल्या मनाच्या एकाही कलाकाराला पुढे यावे असे वाटले नाही. आपण त्यांना नेहमी डोक्यावर घेतो, त्याचे गुणगाण गातो, त्यांना फॉलो करतो. परंतु आपल्यावर जेव्हा संकट ओढावले तेव्हा हे कलाकार मागे का?  हे प्रत्येक मराठी माणसाने याचा विचार केला पाहिजे, आणि इथून पुढे याच्याबरोबर कसे वागायचे, त्याचे चित्रपट पाहयचे की नाही हे प्रत्येकाने ठरवायचे. एक मात्र नक्की पूरग्रस्तांच्या बाबतीत बॉलीवूडच्या मंडळीनी दाखवलेली उदासीनता, फिरवलेली पाठ हे विसरता कामा नये.

आज या महापुराला साधारण पंधरा दिवस पूर्ण होत आहेत. हळूहळू पाणी ओसारत आहे. देशभरातून मदतीचा ओघही सुरु आहे. परंतु खरी कसोटी तर आता आहे, पाणी पूर्णत: कमी झाल्यानंतर रोगराईचा प्रादुर्भाव वाढणार आहे. दुर्गंधी पसरली आहे, घरात साप, मगर, विंचू इत्यादी येत आहेत याला तोड कसे देणार?  शासन आणि प्रशासनाने महापुरात ज्या गतीने सक्रिय व्हायला हवे होते, तसे होताना दिसले नाही.

कोल्हापुरातील चंदगड, आजरा, भुदरगड, गारगोटी, गडहिंग्लज येथील अनेक शेतकरी हाताच्या पोटावर जगणारे आहेत. भात आणि दूध हे येथील शेतकऱ्याचे उदरनिर्वाहाचे मुख्य स्रोत आहेत. परंतु आता भातशेती तर सगळी पाण्याखाली गेली आहे. गोकुळचे दुध संकलन आठवडाभर बंद होते त्यामुळे या कालावधीत शेतकऱ्यावर उपासमारीचे वेळ आली. महाराष्ट्रात मुंबई-पुण्यानंतर सर्वात विकसित आणि सधन कोल्हापूर, सांगलीकडे पाहिले जाते. परंतु त्याच्यावर महापुराचे संकट आल्याने इथला माणुस नक्कीच खचला आहे. आता यांना गरज आहे धैर्याची, पाठबळाची त्याचबरोबर पाठीशी उभं राहण्याची…

या भीषण परिस्थितीत सुद्धा कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त लोकांना सलाम करावासा वाटतो. कारण ज्या पद्धतीने त्यांनी या महापुराला तोड दिले आहे ते खरंच वाखण्याजोगे आहे.

जाता जाता शेवटी मला राहून-राहून हाच प्रश्न पडतो की, या प्रसंगी लोक कसे वागतात? ज्या वेळी खरंच कोणाला तरी आपली गरज आहे, त्याचवेळी आपण त्याकडे दुर्लक्ष करणे किंवा त्या कामी न येणे यापेक्षा दुसरी कोणती शोकांतिका असू शकते. या सर्वांचा धांडोळा घेत असाताना, मला एकिकडे असंवेदनशील नेते मंडळी दिसत आहेत तर, दुसरीकडे संवेदनशील अभिनेते दिसत आहेत.

शेवटी या अगतिक, हतबल पूरग्रस्ताकडे पाहून कुसुमाग्रज यांच्या कवितेतली खालील ओळी आठवतात…

‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा

पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा’!

फक्त एवढेच धैर्य आणि बळ आपण पूरग्रस्तांना देऊया!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *