Wed. Jan 19th, 2022

मोदींसह ‘या’ राजनेत्यांनी वाहिली डॉ. श्रीराम लागूंना श्रद्धांजली

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचं 17 डिसेंबर रोजी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. मराठी नाटक आणि सिनेसृष्टीत त्यांचं योगदान अमूल्य आहे. त्यांच्या निधनावर कलाविश्वातून शोक व्यक्त केला जातोय. तसंच राजकीय क्षेत्रातील नेत्यांनीदेखील डॉ. श्रीराम लागू यांना श्रद्धांजली वाहिली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डॉ. श्रीराम लागू हे खऱ्या अर्थाने सूर्य पाहिलेला माणूस असल्याचं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीदेखील श्रीराम लागू यांना श्रद्धांजली वाहताना महाराष्ट्र एका प्रतिभासंपन्न अभिनेत्याला पारखा झाल्याचं म्हटलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री कार्यालयानेदेखील लागू यांना श्रद्धांजली अर्पण केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लागू यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी लागू यांच्या अभिनयाचं कौतूक केलं.

डॉ. लागू यांनी ‘नटसम्राट’ या नाटकातून मराठी रंगभूमीवर वास्तववादी अभिनयाचा अभूतपूर्व नमूना सादर केला. त्यांच्या ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’, ‘हिमालयाची सावली’, ‘सूर्य पाहिलेला माणूस’ यांसारख्या नाटकांनी मराठी रंगभूमीला समृद्ध केलं. नाटकांप्रमाणेच मराठी सिनेमांतही लागू यांनी लक्षणीय भूमिका साकारल्या. ‘पिंजरा’, ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘मुक्ता’ यांसारख्या अनेक सिनेमांतील त्यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. मराठीप्रमाणेच हिंदी सिनेमांतही काही लक्षवेधी भूमिका केल्या. ‘लावारिस’, ‘घरौंदा’ यांसारख्या हिंदी सिनेमांतील त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. आपले वस्तूनिष्ठ विचार आणि विवेकवादी भूमिका यांसाठी सार्वजनिक जीवनात लागू प्रसिद्ध होते. ‘देवाला रिटायर करा’ या त्यांनी केलेल्या विधानामुळे वादाचं मोहोळ उटलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथेच 17 डिसेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *