प्रकाश शिंदे. प्रतिनिधी. सातारा: '1997 ला शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला तो आजही कायम आहे. पण, काॅंग्रेसमधून राष्ट्रवादी, नंतर अपक्ष, पुन्हा तुतारी आणि आता कमळ असा प्रवास करणाऱ्यांनी किती पक्ष बदलले ते पहावे. आम्ही गद्दारी केली असती तर 35,000 मतांनी त्यांची रिक्षा पलटी केली नसती', असा जोरदार टोला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांना लगावला.
पाटण तालुक्यातील सत्यजितसिंह पाटणकर यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर त्यांनी पालकमंत्री देसाई यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. याला प्रत्युत्तर देत पालकमंत्री देसाई म्हणाले, 'त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, मी एकही शब्द बोललेलो नाही. त्यांनी माझा सुरत, गुवाहाटी गेले असा उल्लेख केला आहे. त्यांचे जसे विषय समोर येतील ते सर्व मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालणार आहे. त्यानंतर आवश्यकता वाटल्यास मी त्यांच्याविरोधात बोलेन. पण, त्यांनी काॅंग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष, तुतारी आणि कमळ असा प्रवास केला आहेच ना? त्यांनी किती पक्ष बदललेत ते पाहावे'.
हेही वाचा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडून आढावा बैठक
पत्रकारांचा पालकमंत्री देसाईंना सवाल:
'आपली कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे का?', असा प्रश्नही पत्रकारांनी पालकमंत्री देसाई यांना केला. यावर शंभूराज देसाई म्हणाले की, 'कोण कोणाची कोंडी करत आहे, यावर आता बोलणे योग्य नाही. पण, मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेळ द्यावा. त्यांच्या कार्यालयाकडे वेळ मागितलेली आहे. याबाबत मी त्यांच्याशी बोलणार आहे', असं स्पष्ट केले.
हेही वाचा: ICC World Test Championship Final 2025: भारतात WTC फायनल होणार की नाही?
महायुती म्हणून लढू... पण, वरिष्ठ निर्णय घेतील:
'सत्यजितसिंह पाटणकर आणि आपणही महायुतीत आहात. त्यामुळे पाटणमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक एकत्र लढणार का?', असा प्रश्नही पत्रकारांनी पालकमंत्री देसाई यांना केला. यावर देसाई म्हणाले की, 'यावर आम्ही महाआघाडी म्हणून निवडणूक लढवू. याबाबत राज्य समन्वय समितीमध्येही प्राथमिक चर्चा झाली आहे. पाटणमध्ये कसे लढायचे याचा निर्णय तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील'.