Sunday, March 08, 2026 11:31:29 PM

Solapur Zilla Parishad Election 2026 : अकरा तालुके असलेल्या जिल्ह्यात परिषदेसाठी 271, तर पंचायत समितीसाठी 485 उमेदवार रिंगणार

सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 गट व जिह्यातील 11 तालुक्यांच्या पंचायत समितीच्या 136 जागांसाठी आज, 7 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे.

solapur zilla parishad election 2026  अकरा तालुके असलेल्या जिल्ह्यात परिषदेसाठी 271 तर पंचायत समितीसाठी 485 उमेदवार रिंगणार

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 गट व जिह्यातील 11 तालुक्यांच्या पंचायत समितीच्या 136 जागांसाठी आज, 7 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी 271, तर पंचायत समितीच्या 136 जागांसाठी 485 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी प्रत्येक तालुक्यातील त्या - त्या स्थानिक नेतृत्वाची कसोटी लागलेली आहे. तर 11 तालुक्यांत होणाऱ्या मतदानासाठी 2758 मतदान केंद्रे असून, 7500 बॅलेट युनिट 3366 कंट्रोल युनिट वापरण्यात येणार आहेत. निवडणुकीसाठी 24 लाख 59 हजाग्र 227 मतदार आहेत.

हेही वाचा : Zilla Parishad Elections 2026: जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मोठा बदल; मार्करला रामराम, मतदारांच्या बोटावर पुन्हा शाई

सध्याची राजकीय परिस्थिती -

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बार्शी आणि मोहोळ तालुक्यातील त्यांच्या जाहीर सभांमध्ये विविध पक्षांचे आमदार व्यासपीठावर दिसल्याने चर्चेला उधाण आलं असतानाच, मोहोळमध्ये चक्क शिवसेनेच्या उमेदवारालाच मत देऊ नका, असे आवाहन शिंदेंनी केल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. बार्शी येथील सभेत ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल शिंदेंच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदेंनी त्यांना थेट शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याचं पाहायला मिळालं. तर मोहोळमध्ये शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू खरे यांनी शिंदेंचं स्वागत केल्याने वेगळीच राजकीय समीकरणं चर्चेत आली.

मोहोळ तालुक्यातील नरखेड पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती आहे. मात्र, एकाच गणातून दोन उमेदवार उभे राहिल्याने आधीच गोंधळाची स्थिती होती. प्रचारसभेदरम्यान स्थानिक नेत्यांनी दिलेल्या चिठ्ठीनंतर एकनाथ शिंदेंनी व्यासपीठावरून “नरखेड गटात ज्योत्स्ना पाटील या आपल्या उमेदवार नाहीत, येथे आघाडीचा धर्म पाळावा,” असं स्पष्ट केलं. शिवसेनेच्या चिन्हावर उभ्या असलेल्या उमेदवारालाच मत देऊ नका, या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, ज्योत्स्ना पाटील या भाजप नेते राजन पाटील यांच्या कार्यकर्त्या असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार नसल्याचं जाहीर केल्याचं सांगण्यात येत आहे.


सम्बन्धित सामग्री