कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत कारागृह घोटाळ्याचा पर्दाफाश केला. 'राज्यातील कारागृहात गेल्या 3 वर्षांत सुमारे 500 कोटींचा घोटाळा झाला आहे', असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. तत्कालीन अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांचे घोटाळ्यातील प्रमुख कारनामे उघडकीस आले आहेत. कारागृह विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचाही घोटाळ्यात सहभाग असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यादरम्यान, 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय तेजस मोरे यांचे सुपेकर यांच्याशी कनेक्शन आहे', असा आरोपही केला आहे.
राजू शेट्टी यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर घोटाळ्याच्या चौकशीला टाळाटाळ केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि गृह सचिवांकडे लेखी चौकशीची मागणी केली आहे. 'मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ न देता टाळाटाळ केल्याने संशय वाढला आहे', असेही ते म्हणाले. मुख्य सचिव आणि गृह सचिवांनी सांगितले की, 'हे प्रकरण वरिष्ठ पातळीवर आहे'. राजू शेट्टी म्हणाले की, 'राज्यातील कारागृहांमध्ये रेशन, कँटीन साहित्य आणि विद्युत उपकरणांच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले आहेत. गहू, तांदूळ, साखर, दाळ यासारख्या वस्तू बाजारभावापेक्षा कित्येक पटींनी जास्त किमतीत खरेदी केल्या गेल्या'.
तेजस मोरे यांच्यावर गंभीर आरोप करताना राजू शेट्टी म्हणाले, 'मोरे यांचे जालिंदर सुपेकर यांच्याशी जवळचे संबंध आहेत. मोरे हे कोणतेही सरकारी अधिकारी किंवा ठेकेदार नसताना कारागृह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून कामे मार्गी लावत असल्याचे समोर आले आहे. तेजस मोरे यांच्यावर यापूर्वी फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असताना त्यांचा मंत्रालयात जावईसारखा वावर आहे. त्यांच्या गाडीला (MH-01-EJ-2707) मंत्रालयात प्रवेश देताना कोणतीही तपासणी केली जात नाही, जी आमदार-खासदारांनाही लागू आहे'.
पुढे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राजू शेट्टी यांनी आणखी एक आरोप केला की, 'यापूर्वीही बांधकाम कामगार कल्याण महामंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव आणि रायसोनी पतसंस्थेतील 1200 कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य आरोपी सुनिल झंवर यांच्यासारख्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना फडणवीस यांनी अभय दिला आहे. जर मुख्यमंत्र्यांमध्ये हिम्मत असेल, तर अमिताभ गुप्ता, जालिंदर सुपेकर, सत्यवान हिंगमिरे, प्रशांत मत्ते, शाहू विभूषण दराडे, गौरव जैन, सुनील ढमाळ आणि अतुल पट्टेकरी यांच्या संपत्तीची ईडी आणि सीबीआयमार्फत चौकशी होावी', अशी मागणी त्यांनी केली.
राजू शेट्टी यांनी गेल्या तीन महिन्यांपासून या घोटाळ्याची चौकशी व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. ते म्हणाले, 'कँटीन, रेशन आणि विद्युत उपकरणांच्या खरेदीत अनियमितता स्पष्ट दिसत आहे. जेल अधीक्षक हर्षद अहिरराव यांनी याबाबत लेखी अहवाल सादर केला, तरीही कारवाई झाली नाही'. जालिंदर सुपेकर यांच्यावर वैष्णवी हगवणे प्रकरणात आणि 550 कोटी रुपयांच्या खंडणीच्या आरोपाखाली आधीच चौकशी सुरू आहे. परंतु त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई झाली नसल्याचा संशय व्यक्त केला.
राजू शेट्टी यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तेजस मोरे, जालिंदर सुपेकर आणि मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांमधील कथित संबंधांमुळे हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे. या घोटाळ्याची चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत हा मुद्दा दाबून ठेवण्याचा निर्धार शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. येणाऱ्या काळात या प्रकरणाचे राजकीय परिणाम कसे होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.