Thursday, February 12, 2026 02:31:26 AM

Imtiaz Jaleel: 'मुंब्रा सोडा, संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करणार...' आधी सहर आता जलील यांचं थेट भाजपला आव्हान

मुंब्र्यातील सहर शेख यांच्या वक्तव्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. पोलिस नोटीसनंतर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी सहर शेखची उघडपणे पाठराखण करत भाजपवर दुहेरी निकषांचा आरोप केला.

imtiaz jaleel मुंब्रा सोडा संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करणार आधी सहर आता जलील यांचं थेट भाजपला आव्हान

Imtiaz Jaleel:मुंब्र्यातील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून, या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. ‘हिरवा मुंब्रा करणार’ या वक्तव्यावरून सहर शेख यांना पोलिसांनी नोटीस बजावल्याने हा मुद्दा अधिकच चिघळला. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे ज्येष्ठ नेते आणि खासदार इम्तियाज जलील यांनी थेट मैदानात उतरत सहर शेख यांची उघडपणे पाठराखण केली आहे.

इम्तियाज जलील हे नुकतेच मुंब्र्यात दाखल झाले होते. त्यांनी सहर शेख यांची भेट घेतल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी जलील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सहर शेख यांच्या वक्तव्यात काहीही आक्षेपार्ह नव्हते, तरीही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. “एका विशिष्ट पक्षाच्या नेत्यांनाच वारंवार नोटिसा दिल्या जातात, पण इतर नेते जे उघडपणे वादग्रस्त आणि द्वेषपूर्ण विधान करतात, त्यांच्यावर कारवाई का होत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

जलील यांनी सांगितले की, देश आणि राज्यातील राजकारणाला रंगांमध्ये विभागण्याचा प्रयत्न सुरू आहे. रंग हा कोणत्याही एका समाजाचा किंवा धर्माचा नसतो, मात्र काही लोक जाणीवपूर्वक रंगांना जाती-धर्माशी जोडून तेढ निर्माण करतात, असा आरोप त्यांनी केला. काही भाजप नेत्यांच्या वक्तव्यांचे उदाहरण देत त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

या पत्रकार परिषदेत जलील यांनी सहर शेख यांच्या वक्तव्याला पूर्ण पाठिंबा देत, “आगामी काळात आम्ही केवळ मुंब्र्यातच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात हिरवा रंग करणार आहोत,” असे ठामपणे सांगितले. तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांना थेट आव्हान देत, “सत्तेच्या जोरावर काहीही करता येईल असा गैरसमज कोणी ठेवू नये. अन्याय झाला तर आम्ही रस्त्यावर उतरू,” असा इशाराही त्यांनी दिला.

इम्तियाज जलील यांनी एमआयएमच्या राजकीय वाटचालीवर भाष्य करत, पक्षाने अल्पावधीतच मोठी राजकीय ताकद निर्माण केल्याचा दावा केला. “आम्हाला जातीवादी ठरवण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र आम्ही संविधानाच्या चौकटीत राहूनच काम करतो,” असे ते म्हणाले. देशात संविधान वाचवण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे मुंब्रा आणि आसपासच्या परिसरात राजकीय चर्चा जोरात सुरू असून, सहर शेख प्रकरण आता राज्यस्तरीय राजकारणाचा मुद्दा बनताना दिसत आहे. येत्या काळात या वादावर सत्ताधारी आणि विरोधकांची पुढील भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री