२४ सप्टेंबर, २०२४, नागपूर : देशाचे गृहमंत्री अमित शाह मंगळवारपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नागपुरात आल्यानंतर ते कविवर्य सुरेश भट सभागृहात कार्यकर्ता संवाद बैठकीत पोहोचले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीत उपस्थित होते. विदर्भातील ६२ विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत अमित शाह संवाद साधणार आहे. लोकसभा निवडणुकीत विदर्भात महायुतीला मिळालेलं अपयश आणि आगामी विधानसभा निवडणुकीत विजयासाठी आखली जाणारी रणनीती यावर या बैठकीत विचारमंथन करण्यात आलं आहे.
भाषणात काय बोलले अमित शाह ?
'भाजपमध्ये निवडणूक जिंकण्याचा पाया ऊर्जावान बूथ कार्यकर्ते आणि संघटना आहे.'
'निवडणुका जवळ आल्या की, इतर राजकीय पक्ष सभा आणि रोड-शो करण्यास सुरुवात करतात, पण भाजप आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठक आयोजित करते.'
'विदर्भात भाजपची मजबूत स्थिती आहे, महाराष्ट्रात भाजप सरकार स्थापन करेल.'
'भाजपचे कार्यकर्ते वैयक्तिक स्वार्थासाठी नाही, तर सांस्कृतिक राष्ट्रवाद प्रस्थापित व्हावा, याशिवाय भारताला सामर्थ्यवान, सुरक्षित आणि समृद्ध बनवण्यासाठी काम करतात.'
'राहुल गांधी अमेरिकेत बोलून आले की विकास झाल्यावर आरक्षण संपवलं जाईल. पण भाजप असं होऊ देणार नाही.'
'आपल्या विभागातील सर्व सहकारी संस्थांना भेट द्या आणि शेतकऱ्यांना मोदी सरकारच्या शेतकरी हिता संबंधित सर्व योजनांची माहिती द्या.' असं आवाहन गृहमंत्री अमित शहा यांनी केलं.