मुंबई: काँग्रेस पक्षाची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही, तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही, असे वक्तव्य शरद पवार गटाच्या बैठकीत खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे महाविकास आघाडी (मविआ) मध्ये नवीन वाद निर्माण झाला आहे. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले की, राज्यातील मित्र पक्षांच्या अशा वागण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विरोधी पक्ष म्हणून उभारण्यासाठी मोठा स्पेस आहे.
कोल्हे म्हणाले, "पराभव हा आधी मनात होतो आणि त्यानंतर रणांगणांत होतो. त्यामुळे मरगळ झटका आणि कामाला लागा. तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत. लक्षात ठेवा, बचेंगे तो और भी लढेंगे."
वडेट्टीवारांचा पलटवार
शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी, "स्वत:च्या पक्षाकडे अधिक लक्ष द्यावे आणि आम्हाला जरा कमी सल्ला द्यावा," असे खोचक शब्द वापरले.
उद्धव ठाकरे आगामी निवडणुकीसाठी विविध बैठका आयोजित करत आहेत, ज्यात स्वबळाचा नारा देण्यात येईल अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी मविआला "घरचा आहेर" दिला आहे. यामुळे मविआतील अंतर्गत संघर्षात आणखी तीव्रता आली आहे.
जयंत पाटलांचा ‘करेक्ट कार्यक्रम’
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची दोनदिवसीय बैठक मुंबईत झाली. समारोपाच्या दिवशी शरद पवार यांनी पक्षाची पुढील दिशा स्पष्ट केली. त्यांच्या योजनेनुसार, पुढे नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येईल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महिलांना 50 टक्के तर खुल्या गटात 60 टक्के तरुणांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला जाईल. तसेच, प्रस्थापित घराण्यांमधील युवकांना बाजूला ठेवून 70 टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची घोषणाही त्यांनी केली.
तथापि, यापूर्वीच शरद पवार यांच्या पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी केली आहे. जयंत पाटील यांना टार्गेट करून करण्यात आलेल्या आरोपावर जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला आणि “आधी निवडणुकीत तुम्ही काय काम केले त्याचा हिशेब द्या, मी आठ दिवसांत राजीनामा देतो,” अशी प्रतिक्रिया दिली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे, ज्यामुळे पक्षातील चढ-उताराची स्थिती अधिक तीव्र झाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.