मुंबई: बीड लैंगिक छळ प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बीडमधील लैंगिक छळ प्रकरणी पोलीस गंभीर नाहीत. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानं माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
बीडमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शिक्षकांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली होती. हा मुद्दा आज विधानसभेत देखील मांडला गेला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एसआयटी चौकशी लावली. बीडमधील लैंगिक छळ प्रकरणी पोलीस गंभीर नाहीत असे म्हणत दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी मुंडेंनी केली आहे. सोमवारी धनंजय मुंडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप केले होते. यावर मी कुणालाही बदनाम करण्यासाठी खोटे आरोप केले नाही असेही मुंडे यांनी म्हटले आहे.
नेमकं प्रकरण काय?
खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये नीटची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ केल्याप्रकरणी दोन शिक्षकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शिक्षकांवर गुन्हा दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बीड शहरात विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे दोन शिक्षक कोचिंग चालवतात. या दोघांकडून नीटची तयारी करणाऱ्या मुलीचा लैंगिक छळ करण्यात आला. क्लासनंतर हे दोन शिक्षक मुलीला केबिनमध्ये बोलावून तिचा लैंगिक छळ करायचे. तिला एकटीला केबिनमध्ये बोलावून किस करायचे, छातीला आणि गुप्तांगाला टच करायचे. तसेच अंगावरील कपडे काढायला लावून फोटो काढायचे असे मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार असह्य झाल्याने मुलीने तिच्या आई वडिलांना सांगितला. त्यानंतर तिच्या पालकांनी थेट पोलीस स्टेशन गाठले आणि सदर प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर खाजगी कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.