मुंबई : नागपूरात आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधीसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. बऱ्याच दिवसांपासून मंत्रिमंडळाच्या विस्ताराची प्रतिक्षा होती. आज नागपूरातील विधानभवनात मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. महायुती सरकारमधील भाजपाच्या 19, शिवसेनेच्या 10 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 9 आमदारांना मंत्रिपद मिळणार आहे. मात्र भाजपाच्या रवींद्र पाटील यांना मंत्रिपदासाठी फोन आला नाही. शिवसेनेकडून दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांना फोन आला नाही. राष्ट्रावादीकडून छगन भुजबळ, अनिल पाटील, धर्मरावबाबा आत्राम आणि दिलीप वळसे - पाटील यांना देखील फोन आला नसल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादीतून छगन भुजबळांना फोन न येता ऐनवेळी धनंजय मुंडे यांचे नाव समोर आले आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून मंत्रिपदाच्या यादीत छगन भुजबळ यांचे नाव नसल्याचे समोर आले आहे.
मंत्र्यांच्या यादीतून छगन भुजबळांचे नाव गायब
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नऊ आमदारांची नावे मंत्रिपदासाठी जाहीर करण्यात आली आहे. नाशिकमधून नरहरी झिरवाळ यांचे नाव देण्यात आले आहे. मात्र छगन भुजबळ यांचे नाव यादीत नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ऐनवेळी धनंजय मुंडे यांचे नाव देण्यात आले आहे. परंतु छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून वगळण्यात आले आहे.