शहरातील सातारा परिसरातील संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त 17 जानेवारी रोजी सायंकाळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रबुद्ध नागरिकांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. पूर्वी व्यवसाय व कामानुसार जाती निर्माण झाल्या, मात्र कालांतराने त्यातून जातिभेद वाढला. आज जातिभेद हा अहंकारातून येतो. तो संपवायचा असेल तर जात न पाहण्याची सवय मनाला लावावी लागेल. हे सर्वांनी प्रामाणिकपणे केले, तर येत्या दहा-बारा वर्षांत जातिभेद संपुष्टात येईल, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
हेही वाचा- Atal Setu Toll-Free: मुंबईकर आता सुस्साट! अटल सेतूवरून करा मोफत प्रवास, मात्र 'या' गाड्यांना भरावा लागणार...
संघ हा व्यक्ती निर्माणाचे काम करतो. संघ प्रतिक्रियेतून तयार झालेले संघटन नाही. संघाची कोणाशीही स्पर्धा नसून सर्व समाजाला सोबत घेऊन देश वैभवसंपन्न करण्याचा संघाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संघाला स्वतः मोठे व्हायचे नाही, समाजाला मोठे करायचे आहे. समाजातील संघटन नाही, तर समाजाचे संघटन करायचे आहे. एक वेळ अशी आली पाहिजे, की सर्व समाज संघाच्या विचारांनी काम करू लागेल, त्यावेळी संघाची वेगळी ओळख राहणार नाही. हेच संघाला अपेक्षित आहे. त्यामुळे संघ समजून घ्यायचा असेल, तर संघाच्या शाखेत आले पाहिजे. तंत्रज्ञानाचा उपयोग करावा, मात्र त्याचे गुलाम बनू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.