नागपूर: भाजपा पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यावर देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील यावर अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे, आता देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे स्पष्ट झाले आहे. अशातच आता उद्या मुंबईत होणाऱ्या महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेणार असून हा महाराष्ट्र राजकारणाचा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी नागपूरमधून देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या बहिणी मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.
नागपूरच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील या लाडक्या बहिणी फडणवीसांच्या कट्टर समर्थक असून त्यांच्या प्रत्येक विजयात आनंद साजरा करण्यासाठी पुढे असतात. यावेळी मुख्यमंत्री म्हणून फडणवीस तिसऱ्यांदा शपथ घेत असल्याने या बहिणींच्या उत्साहाला पारावार नाही. त्याचबरोबरन लाडक्या बहिणी म्हणतात, “आमचा लाडका भाऊ देवा पुन्हा मुख्यमंत्री होत असल्याचा अभिमान आहे. हा ऐतिहासिक क्षण प्रत्यक्ष पाहण्यासाठी आम्ही मुंबईला जात आहोत.”
महायुतीचा शपथविधी सोहळा हा केवळ राजकीय कार्यक्रम नसून, महाराष्ट्राच्या जनतेच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. म्हणून, महाराष्ट्रा सोबत नागपूरच्या कार्यकर्त्यांसाठी हा क्षण अतिशय भावनिक असणार आहे, कारण त्यांच्या मतदारसंघातील नेता राज्याच्या सर्वोच्च पदावर विराजमान होत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत केलेल्या निर्णयांमुळे त्यांना राज्यभर जनतेचा पाठिंबा मिळाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला नवी दिशा मिळेल,असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.