मुंबई: मुंबईत काल पार पडलेल्या ऐतिहासिक विजयी मेळाव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना गती मिळाल्याचे चित्र दिसते आहे. विशेषतः ठाण्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मंचावरून झालेल्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. याच भावना व्यक्त करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात 'धन्यवाद देवा भाऊ, तुमच्यामुळे एकत्र आले ठाकरे भाऊ' असे मजकूर असलेले बॅनर लावले आहेत.
मनसे कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी
मनसेचे ठाणे शाखाध्यक्ष संतोष निकम आणि उपशाखा अध्यक्ष अक्षय आंबेरकर यांनी मिळून या बॅनरची कल्पना पुढे राबवली. या बॅनर्सवर उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो झळकत असून, त्यावर लिहिलेल्या ओळींमधून कार्यकर्त्यांच्या भावना स्पष्टपणे उमटतात. या पोस्टर्समध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अप्रत्यक्षपणे आभार मानले गेले आहेत.
हेही वाचा: छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजेंबद्दल बोलताना शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांची जीभ घसरली
'जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही...'- राज ठाकरे यांचे विधान
कालच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी म्हटले होते की, 'जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही 'आम्हा दोघांना एकत्र आणणं' ते माननीय फडणवीसांना जमलं.' त्यांच्या या विधानाने एकाच वेळी उपस्थित जनसमुदायाला आश्चर्यचकितही केले आणि हसवलेही. याच विधानाच्या आधारावरच मनसेने आभार प्रदर्शनाचे बॅनर ठाण्यात लावले असावेत, असा अंदाज लावला जात आहे.
भव्य विजयी मेळावा आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबईतील कालच्या भव्य विजयी मेळाव्याला मराठी जनतेकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठी अस्मिता, राज्याच्या सांस्कृतिक ओळखीवर भर देत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावरून एकसंघतेचा संदेश दिला. जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार दोन्ही नेत्यांनी बोलून दाखवला. या ऐतिहासिक मेळाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण उभे राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राजकीय एकतेचा हा प्रारंभ भविष्यात कोणते वळण घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.