मुंबई: 'आज दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकल ट्रेनमधून एकूण 8 प्रवासी पडून काहींचा मृत्यू झाल्याची एक अतिशय दुर्दैवी आणि दुःखद घटना घडली आहे. यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना भावपूर्ण श्रद्धांजली! जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना', अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते अनिल देशमुखांनी दिली आहे. तसेच, 'मुंबई लोकल अपघाताची चौकशी व्हावी', अशी मागणी अनिल देशमुखांनी केली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
'दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकल ट्रेनमधून एकूण 8 प्रवासी पडले आणि त्यापैकी काहींचा अपघातात मृत्यू झाला हे अत्यंत दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मात्र, ही घटना नेमकी कशामुळे घडली? याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्सवर पोस्ट करत भावनिक प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री शिंदे?
'मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी झालेल्या भयंकर अपघातामुळे मी खूप व्यथित झालो आहे. ही अतिशय दुःखदायक घटना आहे. रोज सकाळी हजारो प्रवासी या मार्गावरून ये जा करतात. मी मृतांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. जखमींवर तातडीने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देश ठाणे आणि कळवा येथील रुग्णालयांना दिले असून मी स्वतःदेखील डॉक्टरांशी बोललो आहे. रेल्वेमार्फत सदर दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून दुर्दैवी अपघाताचे नेमके कारण या चौकशीतून लगेच समोर येईल', अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 'एक्स'वर पोस्ट केली आहे.