Sunday, February 15, 2026 07:33:56 AM

BMC Election 2026 : 'अ‍ॅक्वा लाईन'ची मुंबईकरांना साथ, मध्यरात्रीपर्यंत धावणार 'मेट्रो 3'

ऑक्टोबर 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपूर्ण 33.5 किलोमीटर मार्गिकेचे उद्घाटन झाल्यापासून मेट्रो 3 ला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

bmc election 2026   अ‍ॅक्वा लाईनची मुंबईकरांना साथ मध्यरात्रीपर्यंत धावणार मेट्रो 3

मुंबई, पुण्यासह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज लोकशाहीचा उत्सव साजरा होत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी आज सकाळी साडे सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, मतदारांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांची आणि मतदानासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी Mumbai Metro Rail Corporation (MMRC) ने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मुंबईची पहिली भुयारी मेट्रो, म्हणजेच Metro 3 (अ‍ॅक्वा लाईन), आज 15 जानेवारी रोजी पहाटे पाच वाजल्यापासून ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहे.

मुंबईच्या राजकीय आखाड्यात आपले नशीब आजमावणाऱ्या सुमारे 1,700 उमेदवारांचे भवितव्य आज EVM मध्ये बंद होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी हजारो सरकारी कर्मचारी आणि पोलीस दल पहाटेपासूनच ड्युटीवर हजर आहेत. निवडणूक कर्तव्यावर असलेल्या या कर्मचाऱ्यांना वेळेवर केंद्रावर पोहोचता यावे आणि रात्री उशिरापर्यंत चालणारे काम आटपून सुरक्षितपणे घरी परतता यावे, यासाठी मेट्रोच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. नियमित वेळापत्रकानुसार सकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी सुटणारी पहिली मेट्रो आज एक तास लवकर म्हणजे पहाटे पाच वाजता सुटली, तर रात्री साडे दहा वाजता थांबणारी सेवा आता दीड तास वाढवून मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

हेही वाचा: BMC Election 2026 : मुंबई महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार?, या मुद्द्यांमुळे गाजलेली निवडणूक कोणाला विजय मिळवून देणार?, पहा कसे होते यंदाचे चित्र

ऑक्टोबर 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपूर्ण 33.5 किलोमीटर मार्गिकेचे उद्घाटन झाल्यापासून मेट्रो 3 ला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आरे ते कफ परेड या प्रवासासाठी रस्ते मार्गे लागणाऱ्या दोन तासांच्या तुलनेत मेट्रोने हा प्रवास केवळ 50 मिनिटांत पूर्ण होत आहे. सध्या या मार्गिकेवरून दररोज सरासरी दीड लाख प्रवासी प्रवास करत असून, आज मतदानाच्या सुट्टीमुळे आणि मतदानासाठी जाणाऱ्या नागरिकांमुळे ही संख्या विक्रमी पातळी गाठण्याची शक्यता आहे. विशेषतः कुलाबा, वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) आणि अंधेरी यांसारख्या गर्दीच्या ठिकाणच्या मतदारांना या विस्तारित सेवेचा मोठा फायदा होणार आहे.

निवडणूक आयोगाने मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असली, तरी रस्त्यांवर होणारी खासगी वाहनांची गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता मेट्रो हा सर्वात उत्तम पर्याय ठरत आहे. मेट्रो प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे केवळ कर्मचाऱ्यांनाच नाही, तर दक्षिण मुंबईतील अरुंद गल्ल्यांमधील मतदान केंद्रांवर जाणाऱ्या नागरिकांनाही ‘वातानुकूलित’ दिलासा मिळाला आहे. “निवडणूक प्रक्रियेत वाहतूक हा अडथळा ठरू नये, म्हणून आम्ही ही विशेष सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे,” असे एमएमआरसीच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यातील 29 महापालिकांच्या या ‘मिनी विधानसभा’ मानल्या जाणाऱ्या निवडणुकीचा निकाल उद्या, 16 जानेवारीला जाहीर होणार आहे. मात्र, आजच्या मतदानादिवशी मुंबई मेट्रोने दाखवलेली ही तत्परता मुंबईकरांच्या पसंतीस उतरली आहे. रस्ते वाहतुकीवर येणारा ताण कमी करण्यासोबतच पर्यावरणपूरक आणि वेगवान प्रवासाचा अनुभव देत मेट्रो 3 आज खऱ्या अर्थाने ‘मुंबईची जीवनवाहिनी’ म्हणून आपली ओळख सिद्ध करत आहे.

हेही वाचा: Ratnagiri Accident News: 70 फूट खोल दरीत कोसळली मिनी बस; एकाचा जागीच अंत, 10 जण मृत्यूच्या दाढेतून परतले


सम्बन्धित सामग्री