Friday, February 13, 2026 07:25:56 PM

Pune Municipal Election 2026 : मतदानाच्या शाईवरून रणकंदन; 'बोगस मतदाना'चा गंभीर आरोप करत रूपाली चाकणकरांची आयोगाकडे तक्रार

मतदान केंद्रातून बाहेर पडल्यानंतर एक मतदार बोटावरील शाई लिक्विडने पुसण्याचा प्रयत्न करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याला रंगेहात पकडले. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी...

pune municipal election 2026  मतदानाच्या शाईवरून रणकंदन बोगस मतदानाचा गंभीर आरोप करत रूपाली चाकणकरांची आयोगाकडे तक्रार

Pune Municipal Election 2026 : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आज, गुरुवारी (15 जानेवारी 2026) मतदान प्रक्रिया सुरू असतानाच बोटावरील शाईवरून मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पुणे निवडणूक आयोगाकडे एक खळबळजनक तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, पुण्यातील प्रभाग क्रमांक 34 (धायरी, नऱ्हे, वडगाव बुद्रुक) मध्ये काही महिला आणि मुले बोटाला लावलेली शाई लिक्विडने पुसून पुन्हा बोगस मतदान करत आहेत. शाईऐवजी वापरल्या जाणाऱ्या 'मार्कर पेन'मुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

धायरीत राडा: कार्यकर्त्यांनी शाई पुसणाऱ्याला पकडले
धायरी फाट्याजवळील नारायणराव सणस विद्यालयातील मतदान केंद्राबाहेर आज सकाळी 10:30 च्या सुमारास हिंसक वळण पाहायला मिळाले. मतदान केंद्रातून बाहेर पडल्यानंतर एक मतदार बोटावरील शाई लिक्विडने पुसण्याचा प्रयत्न करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याला रंगेहात पकडले. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला घटनास्थळीच चोप दिला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मार्करची ही शाई 'थिनर' किंवा सॅनिटायझरने सहज निघत असल्याचा दावा नागरिकांकडून केला जात आहे.

मुंबईतही शाईचा 'मार्कर' गोंधळ; आयुक्तांचे स्पष्टीकरण
पुण्याप्रमाणेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही (BMC Election 2026) शाईच्या गुणवत्तेवरून वाद निर्माण झाला आहे. मुंबईत यंदा पारंपारिक शाईच्या बाटल्यांऐवजी मार्कर पेनचा वापर करण्यात आला आहे. अनेक मतदारांनी तक्रार केली की, शाई लावल्यानंतर काही वेळातच ती पुसली जात आहे. यावर मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले की, नखावरील शाई पुसली जात असली तरी ती त्वचेवर टिकून राहते. मात्र, सोशल मीडियावर शाई पुसण्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने विरोधकांनी निवडणुकीच्या 'फेअरनेस'वर शंका घेतली आहे.

हेही वाचा - Voter ID Photo Mismatch : नाव रवींद्र अन् फोटो महिलेचा... पुण्यात मतदाराची झाली मोठी पंचाईत, पाहा व्हिडीओ

'PADU' यंत्र आणि निवडणूक आयोगाचे वादग्रस्त निर्णय
निवडणूक आयोगाने यंदाच्या निवडणुकीत 'PADU' (Printing Auxiliary Display Unit) नावाचे नवीन यंत्र ईव्हीएमला बॅकअप म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती राजकीय पक्षांना आधी देण्यात आली नव्हती, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. तसेच, मतदानाच्या दिवशीच माध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्रात जाण्यास मनाई केल्याने आयोगाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उल्हासनगर आणि कोल्हापूरमध्येही शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी आल्याने आयोगाने 'शाई त्वचेला लागेल अशी गडद लावा' अशा सूचना दिल्या आहेत.

उल्हासनगरमध्ये प्रभाग क्रमांक 3 मधील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनीही शाईच्या गुणवत्तेवर आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या मते, 2012 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे मार्कर वापरले जात आहेत आणि शाई पुसणे हा कायदेशीर गुन्हा आहे. मात्र, रूपाली चाकणकर यांच्या तक्रारीनंतर आणि पुणे-मुंबईतील घटनांनंतर, बोगस मतदानाचा धोका वाढल्याची भीती राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

हेही वाचा - BMC Election 2026 : निवडणूक मतदान प्रक्रियेवर राज ठाकरेंचा संताप, म्हणाले, 'संपूर्ण प्रकार फ्रॉड...'


सम्बन्धित सामग्री