नवी दिल्ली : राज्यात नुकतेच नवीन सरकार स्थापन झाले. त्यानंतर विशेष अधिवेशन झाले. त्यात राहुल नार्वेकर यांची एकमताने विधानभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर पहिल्यांदाच राहुल नार्वेकर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आहे. यासंबंधीची पोस्ट त्यांनी समाजमाध्यमावर शेअर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचे सौभाग्य मला लाभले असे नार्वेकर यांनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर म्हटले आहे. महाराष्ट्राची प्रगती आणि देशाच्या विकासाशी संबंधीत विषयांवर पंतप्रधानांशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. मोदींच्या मौल्यवान अंतर्दृष्टी, समर्थन आणि मार्गदर्शनासाठी मनापासून कृतज्ञ असल्याचे नार्वेकरांनी पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहे.
भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी कार्य करत असताना मोदींचे नेतृत्व आम्हा सर्वांना प्रेरणा देत आहे. तसेच महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी अखंड भारताच्या दृष्टीकोनातून योगदान देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.
लोकसभा अध्यक्ष यांचीही नार्वेकरांनी भेट घेतली आहे. त्यांना भेटणे हा सन्मान असल्याचे त्यांनी म्हटले. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी नार्वेकरांचे अभिनंदन केले. त्याबद्दल नार्वेकरांनी त्यांचे पोस्टच्या माध्यमातून आभार मानले आहेत. महाराष्ट्राच्या विधिमंडळाची परंपरा अधिक बळकट करण्यासाठी आणि लोकशाही प्रक्रियेच्या सक्षमीकरणासाठी योगदान देण्यास उत्सुक असल्याचे नार्वेकर यांनी म्हटले आहे. बिर्ला यांच्या मौल्यवान समर्थनाची आणि प्रोत्साहनपर शब्दांची मनापासून प्रशंसा करत असल्याची ग्वाही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिली आहे.