नाशिक: नाशिकच्या पालकमंत्रीपदी दादा भुसे होणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. विधानसभेत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या शिंदेंनी सिंहस्थ तयारीचा आढावा घेतला. या बैठकीत शिक्षणमंत्री दादा भुसेही उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी भुसे यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक करत, पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकरच होईल, असे स्पष्ट केले.
शिंदे म्हणाले, "पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून योग्य तो निर्णय घेतील. मात्र, दादा भुसे आजच्या बैठकीत उपस्थित होते. ते शिक्षणमंत्री म्हणून उत्तम काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय सुधारणा झाली आहे."
सिंहस्थ तयारीचा आढावा घेताना शिंदे यांनी नियोजनावर समाधान व्यक्त केले. "सिंहस्थ महोत्सवासाठी भव्य स्वरूपात तयारी सुरू आहे. यात कोणतीही त्रुटी राहणार नाही," असे ते म्हणाले. भुसेंच्या कामाचा उल्लेख करताना त्यांनी केशव गावित या शिक्षकाचे उदाहरण दिले. "हिवाळी शाळा ही संकल्पना एक चमत्कार आहे. त्यामुळेच त्या शाळेसाठी चांगली इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे," असे शिंदेंनी सांगितले.
सिंहस्थ 2027 हे नाशिकसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी प्रशासन सज्ज असून, पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकरच जाहीर होईल, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.