रवी ढोबळे. प्रतिनिधी. सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस ओंकार महादेव हजारे (वय: 32, रा. पापय्या तालीम परिसर, मुरारजी पेठ, सोलापूर) यांनी आत्महत्या केल्याने सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे. ओंकारचा मृतदेह रविवारी रात्री त्याच्या घरासमोरील कारमध्ये पोलिसांना आढळला. त्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. नेमकं कोणत्या करणास्तव त्याने आत्महत्या केली हे अद्यापही अस्पष्ट आहे.
हेही वाचा: ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश
नेमकं प्रकरण काय?
रविवारी दुपारी ओंकार त्याच्या कारमध्ये बसला होता. मात्र, बराच वेळ होऊनही ओंकार बाहेर आलाच नाही. जेव्हा घरच्यांनी आणि शेजाऱ्यांनी कारच्या दरवाजातून डोकावून पाहिले, तेव्हा तो सीटवर निपचित पडला होता. घरच्यांना संशय येताच, त्यांनी कारचा दरवाजा तोडून ओंकारला बेशुद्धावस्थेत बाहेर काढले आणि रुग्णालयात आणले. मात्र, तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
ओंकार हजारे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा सरचिटणीस होता आणि सोलापूर शहर आणि जिल्ह्यात तो पार्थ पवार यांचा विश्वासू आणि जवळचा सहकारी म्हणून ओळखला जात होता. त्याने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम केला होता. त्याच्या जाण्याने त्याच्या मित्रपरिवारातून दुःख व्यक्त होत आहे.