प्रसाद घाणेकर. मुंबई: नाशिकमधील ठाकरे गटाचे माजी शक्तिशाली नेते सुधाकर बडगुजर मंगळवारी दुपारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यांच्या भाजप पक्षात प्रवेशाबाबत काही संभ्रम असला तरी, सुधाकर बडगुजर आणि त्यांचे कार्यकर्ते आज भाजपमध्ये सामील होण्यावर ठाम आहेत. सुधाकर बडगुजर ठाकरे गटात असताना भाजपने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सुधाकर बडगुजर आणि अंडरवर्ल्ड डॉन सलीम कुट्टा यांचे एका पार्टीत एकत्र डान्स करतानाचे फोटो समोर आले होते. त्यावेळी भाजप आमदार नितेश राणे यांनी हा फोटो दाखवून सभागृह डोक्यावर घेतले होते.
हेही वाचा: नागपुरात ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटीलची हत्या; स्थानिकांमध्ये संताप
'या प्रकरणात विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी केली जाईल', अशी घोषणाही त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, आता सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब होताच भाजप नेत्यांची भाषा 180 अंशांच्या कोनात बदललेली दिसत आहे. आक्रमक शैलीत विरोधकांचे लचके तोडणारे नितेश राणे यांनीही सुधाकर बडगुजर यांच्या भाजपमधील प्रवेशाचे स्वागत केले आहे. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.