नागपूर: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत आपली भावना मांडली आहे. नागपुरात एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी व्यक्त केलेल्या या विचारांनी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्या मनातील निष्ठा स्पष्ट झाली आहे.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?
पंकजा मुंडे म्हणाल्या, “माझ्या खात्यासंबंधित पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी मी नागपूरमध्ये आले आहे. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत माझी भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. जालना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मिळालेल्या संधीला अनुभव समजून मी काम करत असते.”
पंकजा मुंडेंची बीडसाठी खंत
“मी बीडची मुलगी असल्याने जर मला बीड जिल्ह्याचा पालकमंत्रीपद मिळाले असते, तर बीडची सेवा करण्याची संधी मिळाली असती. त्यामुळे मला खूप आनंद झाला असता. माझा पाच वर्षांचा कार्यकाळ हा बीडसाठी सर्वाधिक विकसनशील राहिला आहे,” असे पंकजा मुंडे कार्यक्रमादरम्यान म्हणाल्या.
त्याचबरोबर पंकजा मुंडे यांनी मिळालेल्या जबाबदारीबद्दल समाधान व्यक्त केले. “आत्ता झालेल्या निर्णयावर कोणतीही असहमती न दर्शविता मी दिलेल्या संधीचा जास्तीत जास्त उपयोग करून चांगले काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. जालना जिल्ह्यासाठी डबल लक्ष द्यावे लागेल. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आमचे पूर्ण सहकार्य करतील, असा मला विश्वास आहे,” असे त्या म्हणाल्या.
धनंजय मुंडेंबाबत प्रश्न टाळला
धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार देत पंकजा मुंडे म्हणाल्या, “कोण कोणाला काय म्हणाले यावर मी कधीच बोलत नाही. माझ्या भूमिकेवर बोलणे मला अधिक योग्य वाटते.”
https://youtu.be/4Vfe5Z8kXSc
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.