Tuesday, November 11, 2025 10:41:38 PM

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन, मेट्रो अॅक्वा लाईनलाही हिरवा कंदिल

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज दुपारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले.

navi mumbai international airport  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन मेट्रो अॅक्वा लाईनलाही हिरवा कंदिल

नवी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज दुपारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले. यादरम्यान, पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोल आणि इतर मंत्री उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'विजयादशमी आणि कोजागिरी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहाने पार पडला. आता दहा दिवसांनी दिवाळी येणार आहे, त्यासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजपासून मुंबईची मोठी प्रतिक्षा संपणार आहे. आज नवी मुंबईत आतंरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले. हे विमानतळ आशियातील सर्वात मोठे कनेक्टिव्हिटी हबमध्ये जोडण्यास मदत करेल. विशेष म्हणजे, आज मुंबईला भुयारी मेट्रोदेखील मिळाले. एकीकडे, आज नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले, तर दुसरीकडे, भुयारी मेट्रोदेखील आज मुंबईला मिळाले. यामुळे, मुंबईत प्रवास करणे आणखी जलद होईल आणि प्रवाशांचा वेळही वाचेल. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात जमीनीखाली पायाभूत सुविधांचे नुकसान न होता अप्रतिम भुयारी मेट्रो तयार झाले आहे. या प्रकल्पांसांठी अहोरात्र मेहनत करण्याऱ्यांचे मी मन:पूर्वक आभार मानतो'.

हेही वाचा: Mumbai OneTicket: पंतप्रधान मोदींनी लाँच केले ‘मुंबई वनटिकट’ अॅप! आता मुंबईत बस, ट्रेन आणि मेट्रोने प्रवास करणे सोपे होणार

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

'देशाच्या भूमिपुत्रांसाठी एक महान लढा देणाऱ्या महान नेते दि.बा.पाटील यांच्या स्मृतींना मी वंदन करतो. याठिकाणी मी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करतो. ज्यांनी नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळ तयार करण्यासाठी अहोरात्र मेहनत केली, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, गेल्या दहा वर्षांपासून आपण ज्या प्रकल्पांबद्दल बोलत होतो, त्या त्या सर्व प्रकल्पांचे आज उद्घाटन होत आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाची संकल्पना 90च्या दशकात होती. मुंबईहून पुण्याला जात असताना आम्ही विचार करत होतो की, एकेदिवशी नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधले जाईल. पण या प्रकल्पाबाबत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. मात्र, जेव्हा मोदींच्या नेतृत्वाखाली देशात आणि महाराष्ट्रात भाजप सरकार सत्तेत आले, तेव्हा आम्ही पंतप्रधान मोदींना विनंती केली की आपण केलेल्या प्रगतीमध्ये नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश करावा', अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. 

उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया

'महाराष्ट्राच्या विशेषत: मुंबईच्या विकासाला एक नवीन पंख देणाऱ्या 4 महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन होत आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपण सर्वजण घेत आहोत, हा आपल्या सर्वांसाठी सन्मान आहे. महाराष्ट्राच्या विकासाला पंतप्रधान मोदींकडून पाठिंबा, सहकार्य आणि प्रोत्साहन मिळत आहे. देशाच्या विकासाचे नेतृत्व करताना आपल्या सर्वांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे मनापासून आभार मानतो. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस मुंबईच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. पंतप्रधान मोदींनी आज विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. या प्रकल्पातून विकास, सुविधा आणि रोजगाराच्या संधी या त्रिसुत्री प्रभावी संगम होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानकळामुळे फक्त मुंबईच नाही, तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाला एक नवीन दिशा मिळणार आहे', असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.


सम्बन्धित सामग्री