Monday, July 14, 2025 05:44:28 AM

क्रिकेटच्या मैदानातून सुनिल तटकरेंची गोगावलेंवर राजकीय फटकेबाजी

नामदार आदिती चषक क्रिकेट स्पर्धेत तटकरे यांची राजकीय इनिंग्स

क्रिकेटच्या मैदानातून सुनिल तटकरेंची गोगावलेंवर राजकीय फटकेबाजी

रायगडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी माणगाव येथे आयोजित अदिती चषक क्रिकेट स्पर्धेत राजकीय रंग भरला. भारतीय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तटकरे यांनी केवळ क्रिकेटवरच नाही, तर रायगडच्या पालकमंत्री पदावरून सध्या सुरू असलेल्या वादावरही जोरदार फटकेबाजी केली.

सुनिल तटकरे यांनी आपल्या भाषणात मंत्री भरत गोगावले यांना अप्रत्यक्ष टोले लगावत, “पंचांनी दिलेला निर्णय अनेकांना मान्य नसतो, पण स्लो मोशनमध्ये निर्णय देणारा पंचच योग्य असतो,” असे सांगून गोगावले यांच्या पालकमंत्री पदाच्या दाव्यावर निशाणा साधला. त्यांनी धोनीच्या कॅप्टन कुल शैलीचा उल्लेख करत, "कर्णधार शांत असेल तर संघ यशस्वी होतो, पण भडक डोक्याचा कर्णधार असेल तर संघाचं नुकसान होतं," असा सल्ला देत भरत गोगावले यांना पुन्हा टोला लगावला.

या क्रिकेट स्पर्धेत उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी तटकरे यांच्या या राजकीय फटकेबाजीचा मनमुराद आनंद घेतला. त्यांनी आपल्या शैलीत चौकार-षटकारांच्या आतषबाजीतून गोगावले यांच्यावर टीकेचे फटकारे ओढले. तटकरे यांनी, "अपिल एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच करा," असा सल्लाही दिला, ज्यावर उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला.

मंत्री अदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या क्रिकेट स्पर्धेत रायगडमधील अनेक क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. ऋतुराज गायकवाड याची उपस्थिती हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले. तटकरे यांच्या या इनिंग्सने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी सुरू असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील रस्सीखेचीत तटकरे यांनी या व्यासपीठावरूनच आपली भूमिका स्पष्ट केली.

तटकरे यांनी गोगावले यांना कानपिचक्या देत, "राजकारण हे क्रिकेटसारखं आहे, संयम आणि शिस्त आवश्यक असते," असे म्हणत त्यांना संयम ठेवण्याचा इशाराही दिला. तटकरे यांच्या या भाषणाने रायगडचा राजकीय पारा चांगलाच वाढला आहे.

 


सम्बन्धित सामग्री